वाचन संस्कृती हीच खरी ज्ञानाची गुरुकिल्ली – श्रीराम नानल


जनवाचक चळवळीच्या वतीने लोकमंगल हायस्कूलला पुस्तकांची भेट

Advertisement

सातारा
वाचन संस्कृती हीच खरी ज्ञानाची गुरुकिल्ली आहे.वाचनामुळे ज्ञान वाढते, विचार समृद्ध होतात असे प्रतिपादन जनवाचक चळवळ समन्वयक श्रीराम नानल,यांनी केले.
जनवाचक चळवळ यांच्या वतीने ‘लोकमंगल ग्रुप’ शिक्षण संस्थेच्या लोकमंगल हायस्कूल एम.आय.डी.सी. सातारा या विद्यालयास ५ वी ६ वी च्या विद्यार्थ्यांसाठी पुस्तक भेट कार्यक्रमात नानल प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. यावेळी ‘लोकमंगल ग्रुप’ शिक्षण संस्थेचे अध्यक्ष शिरीष चिटणीस, जनवाचक चळवळीचे सहसमन्वयक किरण गाडे, मराठी अध्यापक संघटनेचे समन्वयक प्राचार्य वि .ना लांडगे विद्यालयाचे मुख्याध्यापक विजय यादव यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.
नानल पुढे म्हणाले, वाचनातून व्यक्तिमत्त्व घडते. पुस्तक हेच खरे जीवनातील मित्र असून मोबाईलवर तासन्‌तास वेळ घालवण्यापेक्षा दररोज किमान एक तास पुस्तक वाचनाची सवय प्रत्येक विद्यार्थ्याने स्वतःला लावली पाहिजे. पुस्तकांमधून मिळणारे ज्ञान आयुष्यभर उपयोगी पडते. येथील शिक्षक व विद्यार्थी यांचे नाते वेगळे आपणाला दिसले.आपुलकी जपणारी मुले व शिक्षक येथील आहेत.मनापासून केलेले कोणतेही काम यशस्वी होत असते म्हणून विद्यार्थ्यांनी आपले काम मनापासून केले पाहिजे.जनवाचक चळवळीच्या माध्यमातून आतापर्यंत जिल्ह्यातील विविध शाळांमध्ये जाऊन पुस्तके वाटप करण्याचे कार्य संघटनेच्या वतीने आपण करीत आलो आहोत. पुस्तके खरेदी करण्यासाठी ठाण्याच्या दानशूर नागरिक आशाताई पंडित यांनी अर्थसहाय्य उपलब्ध करून दिले तसेच पुण्याच्या दिलीप राज प्रकाशनने पुस्तक खरेदीवर भरघोस सूट दिली याबद्दल आशाताई पंडित आणि दिलीप राज प्रकाशनचे श्री मधुर बर्वे यांच्या बद्दल नानल यांनी कृतज्ञता व्यक्त केली .
कार्यक्रमाचे अध्यक्ष शिरीष चिटणीस म्हणाले वाचनाची गोडी वाढली पाहिजे .पुस्तकातून विविध माहिती मिळत असते . पुस्तक आपणाला जगाची सफर घडवतात. जरी आपल्याला जगभर फिरता नाही आले तरी वाचनातून विविध देशांची संस्कृती, तेथील साहित्याची माहिती आपणाला मिळत असते . शालेय जीवनात विद्यार्थ्यांनी पुस्तकांशी मैत्री केली पाहिजे. लोकमंगल हायस्कूल मधील विद्यार्थी गेले तीन वर्षापासून मला आवडलेले पुस्तक ही संकल्पना राबवत असून विद्यार्थी आपल्याला आवडलेली पुस्तक वाचतात आणि त्याच्यावर आपले मनोगत स्पष्टपणे मांडत असतात हा आगळावेगळा उपक्रम जिल्ह्याला दिशादर्शक ठरणारा आहे.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यालयाचे मुख्याध्यापक विजय यादव यांनी केले. कार्यक्रमास प्रतिभा वाघमोडे, भास्कर जाधव, देवराम राऊत, बाळकृष्ण इंगळे उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गुलाब पठाण यांनी केले तर उपस्थित यांचे आभार वैशाली वाडीले यांनी मानले
फोटो
डावीकडून शिरीष चिटणीस, बाळकृष्ण इंगळे, विजय यादव, श्रीराम नानल, प्राचार्य वि.ना. लांडगे, किरण गाडे, वैशाली वाडिले व अन्य


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!