केबीपी मॅनेजमेंट इन्स्टिट्यूटमध्ये बी. एस्सी. कॉम्प्युटर सायन्स
सातारा
उच्च शिक्षण क्षेत्रात विद्यार्थ्यांसाठी रयत शिक्षण संस्थेच्या वर्ये येथील कर्मवीर भाऊराव पाटील इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज अँड रिसर्च येथे विज्ञान व तंत्रज्ञान विद्या शाखा सुरू करण्यास महाराष्ट्र शासन आणि शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर यांनी मान्यता दिली आहे. याअंतर्गत शैक्षणिक वर्ष २०२६-२७ पासून बी.एस्सी. कॉम्प्युटर सायन्स हा चार वर्षांचा पदवी अभ्यासक्रम सुरू होणार असल्याचे संचालक डॉ.बी.एस.सावंत यांनी सांगितले.
राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP-2020) अंतर्गत बहुविद्याशाखीय शिक्षणाला चालना देण्याच्या उद्देशाने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता (AI), माहिती तंत्रज्ञान आणि रोजगाराभिमुख शिक्षणाची वाढती गरज लक्षात घेऊन हा अभ्यासक्रम विद्यार्थ्यांसाठी मोठी संधी ठरणार आहे.
या अभ्यासक्रमासाठी बारावी विज्ञान शाखा उत्तीर्ण तसेच पॉलिटेक्निक डिप्लोमा धारक विद्यार्थी प्रवेश घेऊ शकतात. विशेष म्हणजे प्रथम वर्षाच्या प्रवेशासाठी सीईटी परीक्षा अनिवार्य नसल्याने विद्यार्थ्यांना थेट प्रवेशाची संधी उपलब्ध झाली आहे.इच्छुक व पात्र विद्यार्थ्यांनी अधिक माहितीसाठी व प्रवेश प्रक्रियेसाठी संस्थेच्या प्रवेश कक्षाशी संपर्क साधावा, असे आवाहन संस्थेचे संचालक डॉ. बी. एस. सावंत यांनी केले आहे.

