विद्रोही साहित्य संमेलनाची जय्यत तयारी सुरू


चार परिसंवाद ,दोन शिवरायांच्या कार्याचा वेध घेणारी नाटके, कवी संमेलन
सातारा
सातारा येथे येत्या 9 व 10 मे रोजी आयोजित केलेल्या पंधराव्या विद्रोही साहित्य संस्कृती संमेलनाच्या साठीची जय्यत तयारी सुरू आहे. या दोन दिवसाच्या विद्रोही साहित्य संस्कृती संमेलनात चार परिसंवाद ,गटचर्चा , विद्रोही रॅप संगीत , विद्रोही शाहिरी शाहीर जलसा , रंग अमन के , निमंत्रितांचे कवी संमेलन व नवोदितांचे कवी संमेलन तसेच विश्ववंदनीय राजे शिवाजी अंडरग्राउंड इन भीमनगर मोहल्ला तसेच स्टोरी राज्याभिषेकाची हा किरण माने यांचा शो ही दोन नाटके या संमेलनाचे आकर्षण असणार आहे अशी माहिती विद्रोही सांस्कृतिक चळवळ महाराष्ट्राचे अध्यक्ष कॉ. धनाजी गुरव व संयोजन समितीचे अध्यक्ष ह.भ. प. डॉ सुहास फडतरे महाराज यांनी पत्रकार परिषदेत बोलताना दिली.
या पत्रकार परिषदेच्या वेळी संयोजन समितीचे कार्याध्यक्ष विजय मांडके, सहकार्याध्यक्ष मिनाज सय्यद, सरचिटणीस ॲड. राजेंद्र गलांडे, डॉ. प्रशांत पन्हाळकर, प्रा. डॉ. विजय माने, प्रा. गौतम काटकर व संयोजन समितीचे पदाधिकारी व सदस्य आदी उपस्थित होते.
शनिवार दि 9 मे रोजी सातारा येथील पोवई नाक्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून सकाळी नऊ वाजता पद्मश्री लक्ष्मण माने यांच्या हस्ते मशाल पेटवून व कष्टकऱ्यांचा सत्कार करून मिरवणुकीला सुरुवात होणार आहे. कर्मवीर भाऊराव पाटील पत मार्गे गीते बिल्डिंग पर्यंत आणि त्यानंतर बगाडे हॉस्पिटल पर्यंत ही मिरवणूक जाऊन पुढे डॉ. बाबासाहेब आंबेडकर, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि लहुजी वस्ताद यांना अभिवादन करून राजपथावरून राजवाडा येथील गोल बागेतील थोरल्या प्रतापसिंह महाराजांना अभिवादन करून मिरवणूक मोती चौक मार्गे राधिका टॉकीज आणि तेथून कला व वाणिज्य महाविद्यालय येथे संमेलन स्थळी जाईल या मिरवणुकीमध्ये टाळकरी वारकरी संप्रदाय असेल त्याचबरोबर आदिवासी नृत्य व आदिवासी ढोल वाजवणारे असतील लोककलावंत तसेच साहित्यिक कलावंत कार्यकर्ते आणि चित्ररथ असतील.

महात्मा फुले यांचे २०० वे जयंती वर्ष , संत गाडगेबाबा यांचे जयंतीचे दीडशेवे जन्म वर्ष, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे चवदार तळ्याच्या सत्याग्रहाचे शंभरावे वर्ष सुरू होत असताना तसेच क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या 125 व्या जयंती वर्षाचे औचित्य साधून सातारा या ऐतिहासिक व क्रांतिकारक अशा शहरात हे पंधरावे विद्रोही साहित्य संस्कृती संमेलन होत आहे.

नवी दिल्ली येथील ज्येष्ठ विचारवंत प्रा. डॉ.सोनाझरिया मिंझ यांच्या हस्ते संमेलनाचे उद्घाटन होणार आहे. स्वागताध्यक्ष ज्येष्ठ विचारवंत डॉ. आ.ह. साळुंखे असून संमेलनाचे अध्यक्ष शाहीर संभाजी भगत आहेत. यावेळी विचार मंचावर पुणे येथे झालेल्या चौदाव्या विद्रोही साहित्य संस्कृती संमेलनाचे अध्यक्ष डॉ. भारत पाटणकर, कॉ. किशोर जाधव, कॉ. सिद्धार्थ जगदेव, डॉ.जालिंदर घिगे , साथी नितीन पवार , डॉ.मृणालिनी आहेर , प्रा. मंगला साठे उपस्थित असतील.
संमेलनाच्या पहिल्या दिवशी दुपारी तीन वाजता छ. शिवाजी महाराज, छ. संभाजी महाराज, छ. शाहू महाराज यांनी घडविलेला मराठी धर्म या विषयावर नवी दिल्ली येथील डॉ. शरद बाविस्कर यांच्या अध्यक्षतेखाली परिसंवाद होणार असून यामध्ये जावेद पाशा नागपूर, ह.भ.प. भारत महाराज जाधव कैकाडी पंढरपूर आणि उल्का महाजन रायगड हे आपले विचार मांडणार आहेत. त्यानंतर सायंकाळी पाच वाजता रमणी प्रेझेंट्स पुणे आणि आकाश आप्पा सोनवणे निर्मित तरी आम्ही बोलू नये हा विशेष कार्यक्रम सादर होणार आहे.
संध्याकाळी पाच वाजता निमंत्रितांचे कवी संमेलन प्राध्यापिका डॉ. प्रतिभा अहिरे वेरूळ यांच्या अध्यक्षतेखाली होणार असून याचे सूत्रसंचालन दंगलकार नितीन चंदनशिवे करणार आहेत. या कवी संमेलनात महाराष्ट्रातील वेगवेगळ्या भागातील कवी निमंत्रित केले आहेत.

Advertisement

याच दरम्यान सर्व नवोदित कवींसाठी कवी कट्टा हा कार्यक्रम होणार आहे याचे सूत्रसंचालन प्रा. सुरेखा कांबळे , प्रा.आनंद साठे , प्रा. अजित गाढवे हे करणार आहेत. हा कार्यक्रम राजर्षी शाहू सभागृहात होणार आहे. संध्याकाळी सात वाजता पुरोगामी महाराष्ट्राचा विद्रोही रॅप हा Mc Socialist पुणे व अनिकेत कांबळे कोल्हापूर व त्यांचे सहकारी सादर करणार आहेत. रात्री राजकुमार तांगडे लिखित व शाहीर संभाजी भगत यांची संकल्पना गीते व संगीत असलेले विश्ववंदनीय राजे शिवाजी अंडरग्राउंड इन भीमनगर मोहल्ला हे नाटक सादर होणार आहे.

दुसऱ्या दिवशी रविवार दि. 10 मे रोजी सकाळी सहा वाजताच धम्म पहाट हा आगळावेगळा कार्यक्रम होणार असून शाहीर भीमराव कदम व सहकारी , दीक्षा व भूमी मुंबई , शाहीर शशिकांत विधाटे व शाहीर सुरज पवार तसेच बाबासाहेब अटखीळे, विशाल पारदे व प्रिया दुनघव यांचा भीमजलशाचा कार्यक्रम होणार असून त्यानंतर रंग अमनके हा शाहीर धम्मरक्षित रणदिवे व त्यांचे सहकारी सादर करणारा कार्यक्रम होणार आहे. सकाळी दहा वाजता राजर्षी शाहू सभागृहात चल हल्लाबोल हा चित्रपट दाखवण्यात येणार आहे.

बहुजन स्त्री-पुरुषांच्या लढून मिळविलेल्या शिक्षण हक्काचा संघर्ष आणि नवे शैक्षणिक धोरण या विषयावर प्राचार्य डॉ. आनंद मेणसे यांच्या अध्यक्षतेखाली परिसंवाद होणार असून यामध्ये यश आंबोळे, कोल्हापूर प्राचार्य डॉ. राजेंद्र कुंभार कोल्हापूर डॉ.श्रीकांत काळोखे पाथर्डी आणि डॉ. मनोहर नाईक नागपूर हे सहभागी होणार आहेत.
त्यानंतर सकाळी 11 ते दुपारी एक या वेळात साताऱ्याचे खरेखुरे प्रतिसरकार आणि भारतीय संविधान हा आयु. डॉ. भारत पाटणकर यांच्या अध्यक्षतेखाली परिसंवाद होणार असून यामध्ये प्राचार्य डॉ. टी. एस. पाटील, संपत मोरे, ॲड. भाई सुभाष पाटील, कॉ. लता भिसे, डॉ. बाबुराव गुरव हे सहभागी होणार आहेत. तर दुपारी दोन वाजता स्त्रीशक्ती समोरील आजची आव्हाने आणि या चळवळीत पुरुषांचा सहभाग या विषयावर वंदना सोनाळकर मुंबई यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या परिसंवादात प्रा. डॉ. वंदना महाजन, संध्या नरे पवार व प्रा. डॉ. सचिन गरुड हे सहभागी होतील.

त्यानंतर एसटी वाचवा शिक्षण वाचवा, वनवासी जनजाती नाहीच आम्ही आदिवासी, भारतीय ज्ञान परंपरा (आय के एस) नालंदा तक्षशिला की गलगोटिया, भले तरि देऊं गांडीची लंगोटी,नाठ्याळा चि गांठी देऊं माथां आणि शेतकऱ्यांची परंपरा लढण्याची की आत्महत्येची?, महाराष्ट्राची प्राचीन भाषा प्राकृत की संस्कृत ?, लोकशाहीला गोदी मीडियाचा धोका , मुस्लिम, ख्रिश्चन, दलित, आदिवासी, भटके विमुक्त यांच्या एकात्मतेला हिंसेचा धोका आहे का ? लोककलावंतांचे वास्तव पोटासाठी नाचते मी पर्वा कुणाची, या विषयांवर गटचर्चा होणार असून या गटे चर्चेचा समारोप ज्येष्ठ पत्रकार निरंजन टकले हे करणार आहेत.

पद्मश्री लक्ष्मण माने, लोकशाहीर आयु. संभाजी भगत, कॉ. सुबोध मोरे, कविवर्य वाहरू सोनवणे, ॲड. वर्षा देशपांडे, कॉ. अविनाश कदम, प्रसेनजीत गायकवाड, ॲड. राजेंद्र गलांडे , सदाशिव मगदूम, प्रा. गौतम काटकर , प्राचार्य दिनकर दळवी, डॉ. विजय माने, डॉ. ज्योती अदाटे, विकास मगदूम, डॉ. प्रशांत पन्हाळकर, कुसुमताई आलाम, शैला यादव,
अनुप्रिया कदम, संजयकुमार शिंदे, सीमा मुसळे यांच्या उपस्थितीत समारोप होणार आहे. समारोपाची मांडणी विद्रोही सांस्कृतिक चळवळ महाराष्ट्राचे अध्यक्ष कॉ. धनाजी गुरव करणार आहेत. त्यापूर्वी विविध विषयांवरचे ठराव मांडण्यात येतील.

त्यानंतर रात्री साडेसात वाजता स्टोरी शिवराज्याभिषेकाची हा अस्सल मराठी म्युझिकल इतिहासकार इंद्रजीत सावंत यांच्या दुर्बिणीतून पाहिलेली गोष्ट अर्थात द किरण माने शो स्टोरी शिवराज्याभिषेकाची हा कार्यक्रम सादर होणार आहे. हे सर्व कार्यक्रम कला व वाणिज्य महाविद्यालयाच्या प्रांगणात होणार आहेत. या पत्रकार परिषदेस

संयोजन समितीचे अध्यक्ष ह. भ. प. सुहास फडतरे, कार्याध्यक्ष विजय मांडके, सहकार्याध्यक्ष मिनाज सय्यद, सरचिटणीस ॲड. राजेंद्र गलांडे, डॉ. प्रशांत पन्हाळकर, प्रा. डॉ. विजय माने, प्रा. गौतम काटकर, प्रा. डॉ. केशव पवार, प्रदीप मोरे, सलमा मोरे कुलकर्णी, शिवाजी भोसले, हणमंत सावंत, कॉ. दिग्विजय पाटील, राहुल गंगावणे, अमित कांबळे, रोहित क्षीरसागर, आस्तिका आगाशे, विशाल साळुंखे व संयोजन समितीचे पदाधिकारी आदी उपस्थित होते.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!