यशोदामध्ये विश्व मंगल फाउंडेशनची सभा


मान्यवरांची उपस्थिती, मराठी समाजाच्या उन्नतीसाठी फाउंडेशनची स्थापना

सातारा
जागतिक स्तरावर मराठी भाषिक समाजाचे संघटन व मराठी भाषा, संस्कृती आणि परंपरेचा प्रसार करण्याच्या उद्देशाने कार्यरत असलेल्या विश्व मंगल फाउंडेशन या संस्थेची महत्त्वपूर्ण सभा नुकतीच यशोदा टेक्निकल कॅम्पस, सातारा येथे उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली. या कार्यक्रमाला विविध क्षेत्रांतील मान्यवर, शिक्षणतज्ज्ञ, सामाजिक कार्यकर्ते तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी यशोदा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रा. डॉ. दशरथ सगरे होते, तर प्रमुख उपस्थिती म्हणून माजी मंत्री आणि सोलापूर जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते मा. आ. सुभाष देशमुख उपस्थित होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी मान्यवरांचे पुष्पगुच्छ व सन्मानपत्र देऊन स्वागत करण्यात आले.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी मराठी भाषा आणि संस्कृतीचे जतन व संवर्धन करण्याची गरज अधोरेखित केली. जागतिकीकरणाच्या युगात जगभर विखुरलेल्या मराठी समाजाला एका व्यासपीठावर आणून परस्पर संवाद, सहकार्य आणि ज्ञानविनिमयाची संधी निर्माण करणे हे काळाचे महत्त्वाचे पाऊल असल्याचे मत व्यक्त करण्यात आले.
01 मे 2026 रोजी आळंदी येथे विश्व मंगल फाउंडेशन चे उद्घाटन संपन्न होणार आहे, त्यासाठी साताऱ्यातील सर्व मराठी समाजातील व्यक्तींनी उपस्थित राहावे असे आवाहन देखील यावेळी करण्यात आले.
विश्व मंगल फाउंडेशनच्या उद्दिष्टांबाबत माहिती देताना संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, जगभरातील मराठी भाषिक समाजाचे संघटन करणे, मराठी भाषा आणि संस्कृतीचा जागतिक स्तरावर प्रसार करणे, तसेच शिक्षण, उद्योग, उद्योजकता आणि सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या मराठी व्यक्तींना एकत्र आणून परस्पर सहकार्याची भावना दृढ करणे हे संस्थेचे प्रमुख ध्येय आहे.
संस्थेच्या कार्यरचनेमध्ये ग्लोबल एपेक्स कौन्सिल, विविध देश व शहरांमध्ये प्रादेशिक आणि राष्ट्रीय शाखा, तसेच संस्कृती, शिक्षण, उद्योग, युवा आणि सामाजिक क्षेत्रांसाठी विषयवार समित्यांचा समावेश आहे. या माध्यमातून संस्था विविध उपक्रम, परिषद, चर्चासत्रे आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करून जागतिक स्तरावर मराठी समाजाला एकत्र आणण्याचे कार्य करत आहे.
यावेळी यशोदा ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट चे उपाध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर अजिंक्य सगरे, कंग्राळकर असोसिएटचे श्रीधर कंग्राळकर, शेलार आप्पा, संजय शेलार, राजेश वंजारी, एडवोकेट उमेश शिर्के, राजेंद्र साळुंखे, मिहीर सोलापूरकर, विजय पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
या प्रसंगी बोलताना प्रा. डॉ. दशरथ सगरे यांनी शिक्षणसंस्था या केवळ ज्ञान देण्यापुरत्या मर्यादित नसून समाजाशी, संस्कृतीशी आणि मूल्यांशी जोडणारे केंद्र असल्याचे सांगितले. अशा प्रकारच्या उपक्रमांमुळे सामाजिक जाणीव, सांस्कृतिक अभिमान आणि व्यापक दृष्टीकोन निर्माण होतो, असे त्यांनी नमूद केले.
तर मा. सुभाष देशमुख यांनी मराठी भाषा आणि संस्कृतीच्या जतनासाठी सर्वांनी एकत्र येऊन कार्य करण्याची गरज व्यक्त केली. जगभरातील मराठी बांधवांमध्ये परस्पर संवाद वाढवून सामाजिक आणि आर्थिक क्षेत्रांमध्ये नव्या संधी निर्माण करण्यासाठी अशा संस्थांचे योगदान अत्यंत महत्त्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले. या कार्यक्रमाच्या निमित्ताने विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी आपले विचार मांडत मराठी समाजाच्या जागतिक एकात्मतेवर भर दिला. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी यशोदा टेक्निकल कॅम्पसच्या प्राध्यापकवृंद, कर्मचारी परिश्रम घेतले.
सभेच्या शेवटी उपस्थित मान्यवरांचे आभार श्रीधर कंग्राळकर यांच्यावतीने मानण्यात आले. स्वागत व प्रास्ताविक सहसंचालक प्रा. डॉ.रणधीर सिंह मोहिते, प्रमुख पाहुण्यांचा परिचय कुत्र्लसचिव डॉ. गणेश सुरवसे यांनी करून दिला. हा कार्यक्रम मराठी भाषा, संस्कृती आणि समाजाच्या जागतिक एकात्मतेचा संदेश देणारा ठरला.

Advertisement

फोटो ओळ
विश्व मंगल फाउंडेशन आयोजित सभेमध्ये मा. आ. सुभाष देशमुख यांचा सत्कार संस्थेचे अध्यक्ष प्रा. डॉ. दशरथ सगरे यांच्या हस्ते झाला.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!