राज कपूर सरगम कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद
ज्येष्ठ संगीतज्ञ स्वर्गीय अनिल वाळिंबे यांना आदरांजली
सातारा
दीपलक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्था, सातारा व विजय साबळे यांच्या विद्यमाने; साताऱ्यातील ज्येष्ठ संगीतज्ञ स्वर्गीय अनिल वाळिंबे यांना आदरांजली व्यक्त करण्यासाठी राज कपूर सरगम हा कार्यक्रम दीपलक्ष्मी पतसंस्थेच्या सांस्कृतिक हॉलमध्ये पार पडला.
या कराओके गाण्यांच्या कार्यक्रमासाठी अशोक वाळिंबे, शिरीष चिटणीस इंजि.राजेंद्र पाटील, विजय साबळे तसेच आशुतोष व रेश्मा वाळिंबे या प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत गायक वृंदांसह दीपप्रज्वलन करुन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
याप्रसंगी स्वर्गीय अनिल वाळींबे यांना आदरांजली वाहताना श्री.अशोक वाळिंबे म्हणाले,सातारामध्ये संगीत व गाण्यांसाठी झोकून देत काम केले असून तो वारसा पुढे नेत सातारकरासाठी त्यांनी सुरू केलेले गीत संगीत सेवेचे काम पुढेही तन मन आणि धनाने चालू ठेवण्याची परंपरा वाळिंबे कुटुंबीय जपतील
शिरीष चिटणीस यांनी स्व.अनिल वाळींबे यांच्या आठवणी जागवताना; १९८५ सालापासून असलेला घनिष्ठ संबंध अधोरेखित करीत गायक व गायकीमध्ये समाजसेवा करत असणाऱ्या बाबासाहेब पुरंदरेंसारख्या सन्माननीय व्यक्तींना सुद्धा अनिल वाळिंबे यांनी साथ दिल्याचे उदाहरण दिले. सातारसारख्या शहरांमध्ये अशी संगीताची परंपरा रुजवत त्याला राजाश्रय मिळवण्यात केलेल्या प्रयत्नांची गोष्ट सविस्तरपणे विशद केली. कोणत्याही समाजजीवनाचा सांस्कृतिक, कलात्मक विकास होण्यासाठी उपस्थित मा. पुरुषोत्तम सेठ सरांसारख्या सेवाभावी वृत्तीच्या सन्माननीय व्यक्तींमध्ये स्व.अनिल वाळिंबे यांचे नाव असल्याचे सांगितले. पुण्यामध्ये चालू असलेल्या साहित्य व कला सेवेत वाळिंबे बंधूंच्या परिचयाचे मदतीचा ऋणनिर्देश शिरीष चिटणीस यांनी आवर्जून केला.
स्व.अनिल वाळींबे यांचा अभियांत्रिकी क्षेत्रातील संबंध सांगत, सातारा मधील अभियंता फोरम मध्येही अनिल वाळिंबे यांनी संगीताची रुची निर्माण केल्याचे इंजि. श्री.राजेंद्र पाटील यांनी सांगितले.
विजय साबळे यांच्या संकल्पनेतून स्व.अनिल वाळिंबे यांना आवडणारी ५० ते ७० या दशकातील गाण्यांबरोबरच अनिल सरांना आवडणाऱ्या गाण्यांचा राजकपूर सरगम हा सदाबहार कार्यक्रम विजय साबळे यांनी सादर केला.या संकल्पनेला मूर्त स्वरूप देत विजय साबळे, मंजुषा पोतनिस ,सचिन व स्मिता शेरकर,रेवती बंड, ममता नरहरी, सुषमा बगाडे, शिल्पा चिटणीस.. इत्यादी गायकांनी सुश्राव्य गाण्यांची मैफिल श्रोत्यांपुढे सादर केली. विशेष करून ममता नरहरी यांच्या सुन सायबा सुन..,मंजुषा पोतनीस यांच्या सत्यम शिवम् सुंदर च्या अलापाने , शिल्पा चिटणीस ऐ दिल मुझे बतादे या गाण्याने तसेच विजय रेवती यांच्या सावन का महिना पवन करे शोर..सारख्या दुएट आणि इतरांच्या गाण्यांना मिळालेल्या प्रतिसादामुळे मैफिलीची रंगत वाढत गेली.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अँड.स्नेहल कुलकर्णी व ध्वनी संयोजन श्री. सुभाष कुंभार यांनी केले.
अँड.श्री. आशुतोष व सौ.रेश्मा वाळिंबे यांनी श्रद्धांजलीपर कराओके गाण्यांच्या सुमधुर कार्यक्रमासाठी आभार व्यक्त करीत येणाऱ्या काळामध्ये स्वर्गीय अनिल वाळिंबे यांचा गायन संगीताचा वारसा श्री. अशोक वाळिंबे यांचे सोबत पुढे चालवत त्यांच्या आठवणी व गाण्यांच्या संपदेचे जतन करण्याचा मानस व्यक्त केला.

