मुंबईत मोठा रेल्वे अपघात
प्रवासी रेल्वे ट्रॅकवर पडले, 6 जणांचा मृत्यू
मुंबई
मध्य रेल्वेवरील मुंब्रा रेल्वेस्थानकाजवळ आज (9 जून) सकाळी 9.30 वाजताच्या सुमारास भयंकर रेल्वे दुर्घटना घडली. मुंब्रा रेल्वे स्थानकादरम्यान 13 जण रेल्वेमधून पडले. कसाऱ्याहून सीएसएमटीला जाणाऱ्या लोकलमध्ये प्रवासी लटकून जात होते. त्याचवेळी सीएसएमटीवरुन निघालेली दुसरी लोकल प्रवाशांना घासली. यावेळी 13 प्रवासी खाली पडले आणि ६ प्रवाशांचा मृत्यू झाला.
जखमींवर कळवा आणि मुंब्र्यातील रुग्णालयात उपचार सुरु आहेत.तर कळव्यातील काही जखमींना ठाण्याच्या ज्युपिटर रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. सदर अपघात झाला तेव्हा सुरुवातीला पुष्पक एक्सप्रेसमधून प्रवासी खाली पडल्याची माहिती सांगण्यात येत होती. मात्र पुष्पक एक्सप्रेसचा काहीही संबंध नसल्याची माहिती मध्य रेल्वेचे माहिती अधिकारी स्वप्नील निला यांनी दिली.
लोकलमधून प्रवासी फूटओव्हरवरुन प्रवास करत होते. एका ट्रॅकवरुन सीएसएमटीकडे लोकल जात होती. तर दुसऱ्या ट्रॅकवरुन कसाराच्या दिशेने लोकल जात होती. यावेळी दोन्ही लोकलमधील दरवाजावरील प्रवाशांची बॅग एकमेकांना घासली गेली
दिवा-मुंब्रा स्थानकादरम्यान लोकलमधून एकूण 8 प्रवासी खाली पडून झालेल्या दुर्घटनेत काही जणांचा मृत्यू झाल्याची घटना अतिशय दुर्दैवी आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. जखमींना तातडीने शिवाजी हॉस्पिटल आणि ठाणे सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. स्थानिक प्रशासन समन्वय साधून आहे. जखमींना लवकर आराम मिळावा, अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. ही घटना नेमकी कशामुळे घडली, याची चौकशी रेल्वे विभागाने सुरू केली आहे, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
मुंबईतील रेल्वे अपघाताची घटना दुर्दैवी आहे. या देशात माणसांची किंमत नाही. मुंबईतील रेल्वे कशी चालते हेच जगाला आश्चर्य आहे, अशी संतप्त प्रतिक्रिया राज ठाकरे यांनी दिली. तर, मुंबईत नीट रस्ते नाहीत, पार्कींग व्यवस्था नाही. केवळ रेल्वेपुरता हा विषय नसून शहरांचा विचका झाला आहे, अशा शब्दात राज यांनी रेल्वे अपघातावर आपले मत मांडले. मुंबईसह मेट्रो शहरात उंच इमारती उभ्या राहत आहेत, रस्ते नाहीत, लोकं वाढल्याने पार्किंगची व्यवस्था नाही. आग लागली तर बंब जायला वेळ नाही, बाहेरून येणारे लोंढे आहेत. कोण येतंय, कोण जातंय हे कळत नाही. मुंबईत मोनोरेल, मेट्रो आहे. कोण काय वापरताय हे कोणी बघत नाही. शहर म्हणून कोणी बघायला नाही. त्यामुळे, केंद्र सरकारने रेल्वेच्या स्थितीकडे लक्ष दिलं पाहिजे, अशी मागणी राज ठाकरे यांनी केली.
मुंब्रा कळवा येथील घटना दुर्दैवी आहे. ठाणे ते डोंबिवली परिसरातील लोकसंख्या ज्या गतीने वाढली त्या गतीने आपण वाहतूक व्यवस्था वाढवू शकलो नाही. म्हणूनच देवेंद्र फडणवीस सरकारने मेट्रोच्या कामावर अधिक लक्ष केंद्रित केले आहे. पर्यायी रस्त्यांची क्षमता वाढवणे आणि त्याच बरोबर ठाणे बायपास करून दिवाला डायरेक्ट रेल्वे कनेक्शन, सगळे डब्बे 15 डब्याचे करून, क्षमता वाढण्याचा प्रयत्न सुरू आहे. याला 2-5 वर्ष लागणार. अशा वेळेला प्रवाश्यांनी ही शिस्त पाळावी एवढीच विनंती, असं भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या म्हणाले.

