यशवंतरावांचे विचार तरुण पिढीपर्यंत पोहोचावे:क्षीरसागर


कोरेगाव पंचायत समितीमध्ये स्वर्गीय यशवंतराव चव्हाण जयंती

Advertisement

सातारा
“यशवंतराव चव्हाण यांचे योगदान अविस्मरणीय आणि चिरंतन आहे. केवळ महान राष्ट्रीय नेते नव्हे; तर आर्थिक ,राजकीय ,सामाजिक विचार सामान्य माणसाच्या हितासाठी मांडणारे विचारवंत अशा अनुषंगाने त्यांचे जीवन आणि विचार नवीन पिढीपर्यंत पोहोचणे गरजेचे आहे. त्यातून नव्या पिढीला आत्मविश्वास आणि देशाभिमुख कर्तृत्व गाजविण्याची ऊर्जा मिळेल,” असे प्रतिपादन सांख्यिकी विस्तार अधिकारी यशेंद्र क्षीरसागर यांनी केले.
कोरेगाव येथील पंचायत समितीमध्ये स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली .त्यावेळी “यशवंतराव यांचे जीवन, विचार आणि कार्य” या विषयावर श्री. क्षीरसागर बोलत होते.
यावेळी गटविकास अधिकारी सुप्रिया चव्हाण ,सहाय्यक गटविकास अधिकारी लालासाहेब गावडे यांची प्रमुख उपस्थिती होती .तसेच पंचायत समितीचे विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी यावेळी उपस्थित होते. यशवंतराव चव्हाण यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन करण्यात आले.
श्री क्षीरसागर पुढे म्हणाले ,”यशवंतराव चव्हाण यांनी ‘प्रागतीक महाराष्ट्र’ असा लौकिक निर्माण केला. शेती, सहकार,शिक्षण, अर्थ अशा विविध क्षेत्रांमध्ये मूलभूत स्वरूपाचे कार्य करत असताना सामान्य माणूस हाच त्यांच्या संपूर्ण सामाजिक आर्थिक राजकीय नीतीचा केंद्रबिंदू होता. परराष्ट्र ,संरक्षण, अर्थ, गृह अशी अत्यंत महत्त्वाची केंद्र सरकारची खाती त्यांनी अत्यंत सक्षम पणे सांभाळली आणि भरीव कार्य केले. ‘हिमालयाच्या मदतीला सह्याद्री धावून आला’. अशी उक्ती प्रसिद्ध झाली. चीन युद्धावेळी त्यांनी खंबीर भूमिका घेतली. कृषी विद्यापीठासह इतर विद्यापीठे उभी करण्यात मोलाचा वाटा उचलला. महाराष्ट्र साहित्य संस्कृती मंडळ तसेच विश्वकोशाची स्थापना केली.हे सर्व कार्य करीत असताना सभ्य, सुसंस्कृत, नम्र व्यक्तिमत्व ही त्यांची प्रतिमा जनमानसाला भावली आणि अजूनही ती कायम आहे .म्हणूनच राजकीय, सामाजिक ,आर्थिक कोणतेही क्षेत्रातील खऱ्या अर्थाने समाजासाठी झटणाऱ्या कोणत्याही विचारसरणीच्या व्यक्तीला यशवंतराव हे जवळचे वाटतात. युगांतर ,सह्याद्रीचे वारे ,कृष्णाकाठ इत्यादी साहित्य संपदा लिहिणारे यशवंतराव हे साहित्यिक आणि कलाकार यांच्यावर मनापासून प्रेम करणारे होते. स्वातंत्र्याचा खरा अर्थ जर उमगायचा असेल तर यशवंतराव चव्हाण यांचे विचार नवीन पिढीपर्यंत पोहोचायला हवेत .
“गणेश महामूलकर यांनी आभार मानले.
वरिष्ठ सहाय्यक सुहास देशमुख यांनी नियोजन केले.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!