चांगली पुस्तके चांगल्या मित्रासारखी भावनिक सोबत करतात
प्राचार्य डॉ यशवंत पाटणे:दीपलक्ष्मी पतसंस्थेत पुस्तक प्रदर्शनाचे उद्घाटन
सातारा
चांगली पुस्तके ही चांगल्या मित्रासारखी भावनिक सोबत करतात असे उद्गार प्राचार्य डॉ यशवंतराव पाटणे यांनी दीपलक्ष्मी पतसंस्थेने आयोजित केलेल्या पुस्तक प्रदर्शनाच्या उद्घाटन समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून काढले. ते पुढे म्हणाले की सृष्टीतील फुलांना सुगंध आणि सौंदर्य असते. पण फुले दोन-चार दिवसात कोमेजून जातात. पुस्तकातील शब्द फुलांना चिरंतन चैतन्याचे वरदान असते. उत्तम पुस्तके वाचकाला वैचारिक बैठक देतात.पुस्तक मैत्रीतून होणारा लाभ व्यक्तिगत राहत नाही. पुस्तक मैत्रीचे लाभार्थी जेवढे वाढतील तेवढे ते ज्ञान संस्कृतीला उपयोगी पडेल.
दीपलक्ष्मी पतसंस्थेने आयोजित केलेले पुस्तक प्रदर्शन वाचन संस्कृतीला समृद्ध करणारे आहे. धनाची आणि मनाची योग्य गुंतवणूक केली तर जीवन आनंदयात्रा होते. सध्याच्या दूरदर्शन आणि मोबाईलच्या माध्यमातून होणारी करमणूक मानसिक संतुलन बिघडून टाकते आहे. पुस्तके शांत आणि ज्ञानवृद्धी करणारी करमणूक करतात. तसेच मनन प्रक्रियेला गती देतात. म्हणूनच सामाजिक स्वास्थ्यासाठी पुस्तक मैत्री जोपासली पाहिजे. आपल्या भाषणाच्या अखेरीस त्यांनी सातारकरांना या प्रदर्शनास भेट देऊन मोठ्या प्रमाणावर पुस्तके खरेदी करण्याचे आवाहन केले.
महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कोषाध्यक्ष विनोद कुलकर्णी यांनी आपल्या मनोगतात या उपक्रमाचे स्वागत करताना शिरीष चिटणीसांचे मनःपूर्वक कौतुक केले व पुण्याचे प्रकाशक साताऱ्यात पुस्तक प्रदर्शनाला उपस्थित राहतात याचे श्रेय चिटणीसांचे असल्याचे सांगितले.
या समारंभात विशेष उपस्थित असलेले दिलीप राज प्रकाशनाचे मॅनेजिंग डायरेक्टर राजीव बर्वे यांनी आपल्या मनोगतात शिरीष चिटणीस यांच्या या उपक्रमाचे मनःपूर्वक स्वागत करून त्याला दिलीपराज प्रकाशनतर्फे संपूर्ण सहकार्याचे आश्वासन दिले.
ज्येष्ठ साहित्यिक डॉक्टर राजेंद्र माने यांनी मनोगतात या साहित्य चळवळीत त्यांचे योगदान राहील असे आश्वासन देताना सातारकरांना या पुस्तक दिंडीमध्ये सामील होण्याचे आवाहन केले.
उद्घाटन समारंभाच्या प्रारंभी दीपलक्ष्मी पतसंस्थेचे चेअरमन श्री शिरीष चिटणीस यांनी प्रास्ताविक केले. 12 ऑगस्ट हा संपूर्ण देशभर राष्ट्रीय ग्रंथालय दिवस म्हणून साजरा होतो. यानिमित्ताने हे प्रदर्शन आयोजित करून आम्ही भारतीय ग्रंथालय शास्त्राचे जनक, पितामह डॉक्टर एस आर रंगनाथन यांच्या कार्याला एक प्रकारे उजाळा देत आहोत असे चिटणीस म्हणाले. हे प्रदर्शन 23 ऑगस्ट पर्यंत चालणार असून पुस्तकावर भरघोस म्हणजे १००० पर्यंतच्या खरेदीवर २५% सूट व त्यावरच्या खरेदीकेल्यास ४०% पर्यंत सवलत वाचकांना मिळणार आहे. वाचन संस्कृती समृद्ध होण्यासाठी हे पाऊल आम्ही उचलले आहे असे आत्मविश्वासपूर्वक उद्गार त्यांनी काढले. आम्ही पुस्तक प्रेमी समूहाचे यासंदर्भातील कार्य आशादायक असल्याचे ते म्हणाले.
शिल्पा चिटणीस यांनी उपस्थित पाहुण्यांचे स्वागत केले.या अनोख्या समारंभाचे आभार प्रदर्शन प्राचार्य वि.ना. लांडगे यांनी केले. या समारंभास डॉक्टर संदीप श्रोत्री, श्रीराम नानल, भोसले व सातारकरांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली होती. पुस्तके खरेदी करण्यासाठी ही सातारकरांचा विशेष प्रतिसाद लाभला. दररोज सकाळी 10 ते सायंकाळी आठ वाजेपर्यंत हे प्रदर्शन खुले राहणार आहे.
