कारगिल विजय आठवणीनिमित्त दोन पुस्तकांचे प्रकाशन
शनिवारी पुणे येथे विशेष कार्यक्रम
पुणे
२०२४ हे कारगिल विजयाचे रौप्यमहोत्सवी वर्ष आहे. ह्या विजयाच्या आठवणी कायम प्रेरणा देत राहाव्यात ह्या उद्देशाने भारतीय विचार साधना दोन पुस्तकांचे प्रकाशन करत आहे. कारगिल युद्धात प्रमुख विजयी कामगिरी बजावणाऱ्या योगेंद्र सिंह यादव यांना वयाच्या १९व्या वर्षी सर्वोच्च परमवीरचक्राने भूषविण्यात आले. त्यांनी ह्या अनुभवावर लिहिलेले द हिरो ऑफ टायगर हिल आणि स्वप्निल पांडे ह्यांनी लिहिलेले द फोर्स बिहाईंड फोर्सेस ह्या दोन पुस्तकांचा ‘द हिरो ऑफ टायगर हिल’ आणि ‘भारतीय वीर पत्नींच्या कथा – सैन्यामागील शक्ती’ असा मराठी अनुवाद साहित्य अकादमी पुरस्कार विजेत्या सुनेत्रा जोग ह्यांनी उत्कृष्टपणे केला आहे.

या पुस्तकांचा प्रकाशन समारंभ शनिवार दि. 20 जुलै 2024 रोजी सायं. 6 वाजता प्रा. प्र. ल. गावडे सभागृह, पेरुगेट भावेस्कूल, सदाशिव पेठ, पुणे ३० येथे आयोजित केला आहे. या सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून लेफ्टनंट जनरल राजेंद्र निभोरकर (निवृत्त) आणि मेजर मोहिनी गर्गे कुलकर्णी (निवृत्त) उपस्थित राहणार आहेत
द हिरो ऑफ टायगर हिल ह्या प्रेरणादायी पुस्तकाचे अंध विद्यार्थ्यांसाठी ब्रेलमध्ये रुपांतर केले आहे आणि अंध शाळेला ही पुस्तके भेट दिली जाणार आहेत. ‘भारतीय वीर पत्नींच्या कथा’ ह्या पुस्तकातील एक वीर पत्नी श्रीमती तृप्ती नायर ह्या प्रसंगी उपस्थित असतील आणि त्यांचा सत्कार करण्याचे सौभाग्य भाविसास लाभत आहे.
हिरो ऑफ टायगर हिल : ही एका शूर सैनिकाची खरी कहाणी आहे जो आपल्या देशाच्या सन्मानासाठी कोणतीही कसर न ठेवता शौर्याने लढला. कॅप्टन (मानद) योगेंद्र सिंह यादव यांनी भारतीय सैन्यात सेवेचे स्वप्न पूर्ण करण्याच्या परिवर्तनशील प्रवासातून कारगिल युद्धाचे प्रेरणादायी वर्णन त्यांच्या स्वतःच्या शब्दातून केले आहे. कॅप्टन (मानद) योगेंद्र सिंह यादव हे भारतातील सर्वात तरुण परमवीर चक्र पुरस्कार विजेते आहेत. कारगिल युद्धात त्यांनी दाखवलेल्या साहसाबद्दल त्यांना देशाचा सर्वोच्च लष्करी सन्मान देण्यात आला.
भारतीय वीरपत्नींच्या कथा – सैन्यामागील शक्ती : सैनिक धारातीर्थी पडल्यानंतर त्याच्या कुटुंबीयांना त्याचा विरह सहन करावा लागतो. त्याचा सर्वोच्च त्याग गौरावला जातो मात्र त्याची आई, बहिण, पत्नी आणि प्रसंगी मुलगी सुद्धा त्याच्या कायमच्या वियोगाचे दुःख सहन करतात. अशाच सैनिकांनी दिलेल्या बलिदानानंतर त्यांच्या पत्नींनी केलेल्या संघर्षाच्या, अनुभवलेल्या विरहाच्या आणि तरीही देशप्रेमाखातर पुन्हा एकदा उभे राहत काहींनी आपल्या पतीनेच निवडलेल्या सैनिकाच्या मार्गाचा केलेल्या स्वीकाराच्या ह्या कथा. यातील कथांमधून येणारे भारतीय स्त्रियांचे धैर्य आणि ताकद यांसमोर आपण नतमस्तक होतो. या पुस्तकात असणाऱ्या स्त्रियांशिवाय आणखीही शेकडो स्त्रियांना आपल्या दुःखाचा सामना करण्यासाठी आणि त्या एकट्या नाहीत हे सांगण्यासाठी हे पुस्तक मदत करते. या पत्नी एकट्या नाहीत तर संपूर्ण समाज त्यांच्या या अलौकिक आयुष्यात कायमच त्यांच्या पाठीशी आहे.
