महाराष्ट्र सर्वोत्कृष्ट कृषी राज्य
१५ व्या कृषी नेतृत्व समितीचा पुरस्कार जाहीर
मुंबई
१५ व्या कृषी नेतृत्व पुरस्कार समितीचा २०२४ चा सर्वोत्कृष्ट कृषी राज्य पुरस्कार महाराष्ट्राला जाहीर झाला आहे. भारताचे माजी मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती पी. सदाशिवम यांच्या अध्यक्षतेखालील १५ व्या कृषी नेतृत्व पुरस्कार समितीने ही घोषणा केली आहे. नवी दिल्ली येथे १० जुलै रोजी होणाऱ्या सोहळ्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हा पुरस्कार स्वीकारणार आहेत.
या पुरस्कारांसाठी समितीने राज्यातील पर्यावरण रक्षण, अन्न सुरक्षा यांच्या माध्यमातून घेतल्या गेलेल्या शाश्वत विकास धोरणांची दखल घेतली असल्याची माहिती राज्याच्या कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी दिली आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील सरकारने राज्यात बांबू लागवड, तृण धान्य- श्रीअन्न अभियान आणि औष्णिक वीज निर्मितीत बायोमासचा वापर अशी क्रांतिकारी पावले उचलली आहेत. या पावलांमुळेच हा प्रतिष्ठेच्या मानांकित पुरस्कारावर महाराष्ट्राचे नाव कोरले गेल्याचे श्री. पटेल यांनी नमूद केले आहे.
हा पुरस्कार १० जुलै रोजी नवी दिल्लीत होणाऱ्या १५ व्या कृषी नेतृत्व संमेलनात प्रदान केला जाईल. या संमेलनात केंद्रीय रस्ते परिवहन आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंग चौहान तसेच ब्राझील, अल्जेरिया, नेदरलँडचे राजदूत, महाराष्ट्र, यूपी, हरियाणा, हिमाचल प्रदेश, नागालँड या राज्याचे मंत्रीगण व इतर मान्यवर सहभागी होणार आहेत.
यापुर्वी हा पुरस्कार २०२३ मध्ये तामिळनाडुला, २०२२ मध्ये उत्तर प्रदेशला मिळाला होता. समितीचे विद्यमान अध्यक्ष न्या. सदाशिवम यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांचा या पुरस्कार निवड समितीमध्ये समावेश आहे.आतापर्यंत हा पुरस्कार केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह, शिवराजसिंह चौहान, ज्येष्ठ नेते शरद पवार, खासदार अखिलेश यादव तसेच स्व. प्रकाशसिंह बादल, स्व. वर्गीस कुरियन, स्व. एमएस. स्वामिनाथन यांना दिला गेला आहे. अँग्रीकल्चर टुडेच्यावतीने या पुरस्कारांची सुरवात केली आहे. स्व. स्वामीनाथन यांनी दहा वर्षे या संस्थेचे अध्यक्षपद भुषवलेले आहे. सध्या डॉ. एम. जे. खान या संस्थेचे अध्यक्ष आहेत.
मुख्यमंत्री श्री. शिंदे, उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस, उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी मानव जातीवरील संकट ओळखून, तिला वाचवण्यासाठी जे निर्णय घेतले आहेत, उपाययोजा केल्या आहेत. त्याबद्दल या तिघांचेही आणि महाराष्ट्राच्या या प्रयत्नांची दखल घेऊन, त्याला पुरस्कार दिल्याबद्दल डॉ. खान यांचे कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष श्री. पटेल यांनी आभार मानले आहेत.
