भारतातून कैलास मानसरोवरचे दर्शन
15 सप्टेंबरपासून उपक्रम होणार सुरु
नवी दिल्ली
आता पवित्र कैलास मानसरोवर दर्शनासाठी भाविकांना चीनला जावे लागणार नाही. 15 सप्टेंबरपासून भाविकांना भारतीय मातीतूनच कैलास मानसरोवराच्या दर्शनाचा लाभ घेता येणार आहे.या दर्शन यात्रेची तयारी शासनस्तरावर करण्यात आली आहे. त्यासाठीचे प्रवास नियम लवकरच जारी केले जातील. उत्तराखंडमध्ये, पिथौरागढ जिल्ह्यातील चीन सीमेला लागून असलेल्या जुन्या लिपुलेख येथून कैलास मानसरोवराचे दर्शन घेण्याचे प्रयत्न अंतिम टप्प्यात आहेत. आदि कैलास आणि ओम पर्वताचे दर्शन घेताना भाविक नाभिधंग येथून वाहनाने सुमारे 12 किलोमीटरचे अंतर कापतील.
यानंतर, पवित्र कैलास पर्वत पाहण्यासाठी, समुद्रसपाटीपासून 17 हजार 500 फूट उंचीवर असलेल्या जुन्या लिपुलेखपासून व्ह्यू पॉईंटवर जाण्यासाठी भाविकांना सुमारे 200 मीटर अंतर चालावे लागेल. तेथून ते त्यांचे आराध्य दैवत भगवान शिव यांचे निवासस्थान असलेल्या कैलास पर्वताचे विहंगम दृश्य स्वतःच्या डोळ्यांनी पाहू शकतील. भाविकांना येथे पूजा आणि ध्यान करण्याची संधीही मिळणार आहे. हा प्रवास अधिकृतपणे सुरू होणार आहे.
कैलास पर्वताच्या दर्शनासाठी यात्रेकरूंना सकाळी पाठवले जाईल. तेथे हवेचा दाब जास्त असल्याने दिवसभर दर्शन घेणे सोपे नाही. सरकारी सूत्रांनी सांगितले की, प्रवासी एजन्सी प्रवाशांसाठी ऑक्सिजनची पर्यायी व्यवस्था करण्यास बांधील असेल. कैलास पर्वत पाहण्यासाठी प्रवाशांना 17,500 फूट उंचीवर जावे लागेल. तेथे ऑक्सिजनची पातळी अत्यंत कमी असल्याने कोणतीही अडचण येऊ नये म्हणून प्रवाशांना प्रथम दोन दिवस गुंजी येथे थांबविण्यात येणार आहे. त्यानंतरच त्यांना पुढील प्रवासासाठी पाठवले जाईल. कैलास पर्वताच्या दर्शन यात्रेचे काम वेगाने सुरू आहे. 15 सप्टेंबरपासून भाविकांसाठी ही यात्रा सुरू होणार आहे. याद्वारे भाविक भारतात राहून जुन्या लिपुलेख येथून शिवधामला भेट देऊन पूजा करू शकतील.
