छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार प्रेरणादायी


प्रवचनकार व शिवचरित्र व्याख्याते अनिल सावंत यांचे मत
सातारा
आपल्या जीवनात येणाऱ्या अनेक अडचणींना सामोरे जाऊन अडचणीतून शिताफीने कशी सुटका करून घ्यावी हे शिवचरित्र आपल्याला शिकवते. छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आचरणात आणले तर पुढील पिढी चांगली घडेल असे मत प्रसिद्ध प्रवचनकार व शिवचरित्र व्याख्याते अनिल सावंत यांनी मांडले. ते गौरीशंकरच्या डॉ.पी. व्ही.सुखात्मे इंग्लिश मीडियम स्कूल लिंब येथे शिवराज्याभिषेक दिनाच्या निमित्याने आयोजित केलेल्या कार्यक्रमामध्ये बोलत होते.
यावेळी छत्रपती शिवाजी महाराज व सरस्वती प्रतिमेचे पूजन केले कार्यक्रमाला सुरुवात झाली.
यावेळी गौरीशंकर चे जनसंपर्क अधिकारी श्रीरंग काटेकर, प्रभारी प्राचार्य घनश्याम चव्हाण, अमित मडके , नितीन शिवथरे , सर्व शिक्षक,विद्यार्थी,शिक्षकेतर कर्मचारी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अनिल सावंत पुढे म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांनी रायरेश्वरावर स्वराज्याची प्रतिज्ञा घेऊन स्वराज्य कार्याला प्रारंभ केला. आपल्या मावळ्यांना बरोबर घेऊन आदिलशाहीचे काही किल्ले जिंकून ताब्यात घेतले. खवळलेल्या आदिलशहाने एकाच वेळी या पिता-पुत्रांचा बंदोबस्त करायचा म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांवर फत्ते खान नावाचा सरदार दहा हजाराची फौज घेऊन स्वराज्यावर पाठवला. थोरल्या संभाजी महाराजांच्या विरोधात बंगळूरास फर्राद खान नावाचा सरदार मोठ्या फौजेनिशी पाठवला. तिसऱ्या बाजूने मुस्तफा खान व बाजी घोरपडे यांना जिंजी येथे शहाजी महाराजांना कैद करण्यासाठी पाठवले. फत्तेखानाच्या दहा हजार फौजेचा अवघ्या बाराशे मावळ्यांनी पराभव केला. थोरल्या संभाजी महाराजांनी सुद्धा फर्राद खानाचा पराभव केला. परंतु शहाजी महाराजांना अटक झाली. छत्रपती शिवाजी महाराजांनी दिल्लीच्या शहाजहानला खलिता पाठवून आम्ही आपले चाकर आहोत असे सांगून वडिलांची सुटका करण्यास सांगितले. तातडीने शहाजहानने विजापूरच्या आदिलशहाला शहाजी महाराजांना सोडण्याबद्दलचा खलिता रवाना केला.शहाजी महाराजांना सोडून द्या, नाहीतर आमच्या रोशाला कारण व्हाल असा सज्जड दम भरला.घाबरून विजापूरच्या आदिलशहाने शहाजी महाराजांना मोठ्या सन्मानाने मुक्त केले. महाराजांनी मोठ्या बुद्धिमत्तेच्या जोरावर आपल्या वडिलांची सुटका केली. महाराजांचे अनेक शोध प्रसिद्ध आहेत. अन्याय अत्याचार होणाऱ्या रयतेला मुक्त करून स्वराज्याच्या छत्राखाली आणले.
आपल्या पारखी नजरेने अनेक मावळे मिळवले. अखंड हिंदुस्तानचा राजा म्हणून छत्रपती शिवाजी महाराज बत्तीस मण सिंहासनावर आरुढ झाले.
किल्ले रायगडावर महाराजांचा राज्याभिषेक संपन्न झाला.
यावेळी स्कूलच्या आरोही सावंत व माही भोसले या चिमुकल्या विध्यार्थिनींनी शिवगर्जना सादर करून उपस्थितांची मने जिंकली.या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे अनिल सावंत यांचे स्वागत जनसंपर्क अधिकारी श्रीरंग काटेकर यांनी केले. प्रास्ताविक व सूत्रसंचालन तन्वी ढवळे व हर्षदा तावरे यांनी केले. तर आभार प्राचार्य घनश्याम चव्हाण यांनी मानले.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!