कवियत्री शांता शेळके यांच्या कवितांना नव स्वरसाज
स्वरसाधना गीतगुंजन यांचा उपक्रम,रसिकांचा प्रतिसाद
सातारा
स्वरसाधना -गीतगुंजन निर्मित ज्येष्ठ कवियत्री शांताबाई शेळके यांच्या ‘कळ्यांचे दिवस फुलांच्या रात्री ‘ या काव्यसंग्रहातील निवडक कविता, कवी गंगाधर महांबरे आणि कवि महालिंग मेणकुदळे यांच्या दोन कवितांना संगीतकार राजेंद्र रानडे यांनी संगीतबद्ध केलेल्या अत्यंत सुरेल भावमधुर गीतांचा कार्यक्रम न्यू इंग्लिश स्कूलच्या गणेश सभागृहात सादर झाला.
ही सर्व श्रवणीय गीते यापूर्वी कोणी संगीतबद्ध केलेली नसून प्रथमत:च स्वरसाज चढवून स्वरसाधनाच्या सौ प्रज्ञा लाटकर आणि विद्यार्थिनी सौ मयूरी जोशी, सौ.दीपश्री सुकाळे, सौ.नीलांबरी खरे, कु.जान्हवी शिंदे, कु.सई कुलकर्णी यांनी सुमधुर भावनात्मकतेने गायली.त्यामुळे सातारकरांनी या नवप्रयोगाला उत्स्फूर्त हजेरी लावून मनसोक्त दाद दिली. या सर्वस्वी नवीन संगीतबद्ध गीतांना वादक म्हणून स्वत: संगीतकार राजेंद्र रानडे- सिंथेसायझर, मंगेश सारंग,कोल्हापूर– सिंथेसायझर, बेस गिटार प्रवीण जाधव, सुजीत गायकवाड –ऑक्टोपाड व ढोलक, कमलाकर दळवी – तबला, कु स्वरा किरपेकर – हार्मोनियम यांनी साथ संगत केली. तसेच ध्वनि संयोजन नलवडे यांचे होते. कार्यक्रमाचे अत्यंत खुसखुशीत, रंजक व माहितीपूर्ण सूत्रसंचालन, निवेदन सौ दीपा शिंदे यांनी केले. तसेच शांताबाईंच्या साहित्यावरपीएचडी केलेल्या श्रीमती ज्योत्स्ना कोल्हटकर यांनी शांताबाईंच्या बरोबर प्रत्यक्ष झालेल्या साहित्यिक चर्चा, माहिती, त्यांच्या आठवणी, त्यांच्या लेखनसाहित्त्याचे प्रकार आणि स्वरूप, त्यांचे भाषा प्रभुत्व, त्यांचे बहुआयामी व मराठीसह इतर भाषांतील साहित्याचा अभ्यास असणारे व्यक्तिमत्व, त्यांच्या कवितांच्या मागील गूढ भावात्मकता सहज उलगडून दाखवली
कार्यक्रम यशस्वतेसाठी संतोष वाघ, सारंग किरपेकर , शिरीष चिटणीस, राजेंद्र आफळे,रवींद्र कुलकर्णी, सुनील कुंभार, सौ. शैला रानडे यांचे मोलाचे सहकार्य लाभले. या कार्यक्रमाला साहित्य, संगीत क्षेत्रातील अनेक नामवंत हजर होते.
