नटेश्वरा कार्यक्रमाचे साताऱ्यात आयोजन
समृद्ध संगीत रंगभूमीचे दर्शन घडवणारा कार्यक्रम
सातारा
लोकप्रिय संगीत नाटकातील विविध लोकप्रिय भूमिकांचे दर्शन घडवणारा, अभिजात मराठी भाषेचे सौंदर्य, समृद्धी आणि विविधता यावर आधारित लोकप्रिय नाट्यपदे,नाट्यप्रवेश, नाट्यस्वगतं यांचा अंतर्भाव असलेल्या “नटेश्वरा” या कार्यक्रमाचे आयोजन १४ सप्टेंबर, रविवार संध्याकाळी साडेपाच वाजता करण्यात आले आहे. संजय गोसावी यांची संकल्पना असून शाहू कलामंदिर, सातारा येथे ही गद्य-पद्यात्मक सदाबहार मैफल राहणार आहे.
संगीत रंगभूमीचा समृद्ध वारसा आपल्या मराठी रंगभूमीला लाभला आहे. संगीत रंगभूमीच्या इतिहासातील अनेक नाटके ज्याप्रमाणे आजही लोकप्रिय आहेत , त्याचप्रमाणे या नाटकातील लोकप्रिय नाट्यपदे म्हणजे मराठी रसिकांनी जपलेली मर्मबंधातली ठेव.. आण्णासाहेब किर्लोस्कर, कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर,देवल मास्तर, राम गणेश गडकरी, स्वा. सावरकर,विद्याधर गोखले, वि वा शिरवाडकर अशासारख्या अनेक प्रतिभावंत नाटककारांची परंपरा आपल्या संगीत रंगभूमीला लाभली आहे.संगीत रंगभूमीचे महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे अशा प्रतिभावंत नाटककरांच्या विविध लोकप्रिय नाटकातील अभिजात मराठी भाषेचे सौंदर्य, समृद्धी आणि विविधता यांचे दर्शन घडवणारे संवाद (गद्य) आणि नाट्यपदे (पद्य) यामुळे संगीत रंगभूमी समृद्ध होत गेली..
त्याचप्रमाणे या सर्वच नाटकातील विविध गाजलेल्या भूमिका आजही रसीकांच्या मनावर कायमस्वरूपी कोरल्या गेलेल्या आहेत. उदा. भामिनी, नारद तळीराम, सुधाकर, लक्ष्मीधर, खासाहेब सिंधु, रुक्मिणी इत्यादी.. अशा या व्यक्तिरेखा म्हणजे जणू नटेश्वराचीच रूपे.आणि नटेश्वर तर साक्षात संगीत रंगभूमीवरील कलाकारांसाठी आद्य दैवतच..
संगीत रंगभूमीवरील अनुभवी अभिनेता संजय गोसावी, गायक अभिनेता ओंकार खाडिलकर, निर्झरी चिंचाळकर, मृणाल गोसावी हे कलाकार यात सहभागी असून, संगीत रंगभूमीवरील प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री अस्मिता चिंचाळकर यांचा सहभाग हे कार्यक्रमाचे बलस्थान आहे. ऑर्गनची साथ प्रसिद्ध गायक, हार्मोनियम,ऑर्गन वादक श्री उदय कुलकर्णी करणार असून,त्यांचीच शिष्या साताऱ्याची आश्वासक युवा हार्मोनियम वादक स्वरा किरपेकर हार्मोनियमची साथ करणार आहे. तर तबल्याला प्रसिद्ध साथीदार श्री अभिजीत जायदे असणार आहेत.
कलांगण अकादमी पुणे यांची या कार्यक्रमाची निर्मिती असून,दीपलक्ष्मी सहकारी संस्था मर्यादित -सातारा यांच्या सहयोगाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून,साहित्य परिषदेचे कार्यवाह श्री. शिरीष चिटणीस, वैद्य श्री. अनंत निमकर, पंचम संस्थेचे श्री. श्रीराम कुलकर्णी, श्री. सुधीर पाध्ये तसेच श्री. सारंग किरपेकर यांचा संयोजनात महत्त्वाचा वाटा आहे.
संगीत रंगभूमीच्या समृद्धतेचे दर्शन घडवणाऱ्या या कार्यक्रमाला सातारकर रसिकांनी भरघोस प्रतिसाद द्यावा असे आवाहन आयोजका तर्फे करण्यात आले आहे.

