लग्नातील फटाक्यांनी घेतला 6 जणांचा जीव


बिहारमधील दरभंगा येथील दुर्दैवी घटना

Advertisement

पाटणा :
अनेकदा आनंद साजरा करताना लोक फटाक्यांची आतषबाजी करताना दिसतात. मात्र, आता या आतषबाजीने सहा जणांचा जीव घेतल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.बिहारमधील दरभंगा येथे एक हि मोठी दुर्घटना घडली आहे. इथे लग्नाच्या वरातीतील फटाक्यांमुळे एका घराला आग लागली. त्यामुळे एकाच कुटुंबातील सहा जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
या घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि अग्निशमन दलाच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, दरभंगा जिल्ह्यातील अलीनगर ब्लॉकमधील अंटोर गावात ही घटना घडली. गावात लग्नसमारंभ चालू होता. यावेळी लोक लग्नात फटाके फोडत होते. दरम्यान, फटाक्यांच्या ठिणगीमुळे घराला आग लागली.काही वेळातच आग इतकी पसरली की ती विझवणं कठीण झालं. आग घरात ठेवलेल्या गॅस सिलेंडरपर्यंत पोहोचली आणि काही वेळाने सिलेंडरचा स्फोट झाला. यानंतर दारात ठेवलेल्या डिझेलच्या ड्रमलाही आग लागली, त्यामुळे प्रकरण अधिकच भयावह बनलं. काही वेळातच संपूर्ण घरामध्ये आगीच्या ज्वाळांचा भडका उडू लागला. सर्वत्र आरडाओरडा झाला.
जीव वाचवण्यासाठी लोक इकडे तिकडे धावू लागले. संपूर्ण घरातील साहित्य जळून खाक झालं. यावेळी आजूबाजूच्या परिसरात घबराट पसरली. ज्वाळा दूरवर दिसत होत्या. लोकांनी तत्काळ पोलीस आणि अग्निशमन दलाला माहिती दिली. मात्र, तोपर्यंत या घटनेत एकाच कुटुंबातील सहा जणांचा आगीत होरपळून मृत्यू झाला.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!