अंबाबाईचे दर्शन दोन दिवस बंद
दि.१४ व १५ एप्रिल रोजी मूर्तीचे संवर्धन
कोल्हापूर :
भारतीय पुरातत्व विभागाच्यावतीने करवीर निवासिनी अंबाबाई देवीच्या मूर्तीचे दोन दिवस संवर्धन करण्यात येणार आहे. त्यामुळे दि.१४ व १५ एप्रिल रोजी देवीचे दर्शन बंद राहणार आहे.भाविकांना दर्शनासाठी पितळी उंबऱ्याच्या बाहेर कलश व उत्सवमूर्ती ठेवण्यात येणार आहे.
करवीर निवासिनी श्री अंबाबाई मूर्तीची झीज झाल्याने तातडीने संवर्धन करण्याची गरज असल्याचा निष्कर्ष तज्ञांनी दिला आहे. मूर्ती संवर्धनासंबंधीचा दावा दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर कोल्हापूर यांच्यासमोर सुरू आहे. न्यायालयीन आदेशानंतर पुरातत्त्व खात्याचे निवृत्त अधिकारी आर. एस. त्र्यंबके व विलास मांगीराज यांनी १४ व १५ मार्च रोजी केलेल्या पाहणीचा अहवाल न्यायालयात सादर केला होता.
त्यानुसार भारतीय पुरातत्व विभागाच्या वतीने करवीर निवासिनी देवीच्या मूर्तीचे संवर्धन दि.१४ व १५ एप्रिल रोजी करण्यात येणार आहे. यादरम्यान भाविकांना देवीच्या मूळ मूर्तीचे दर्शन राहणार असून उत्सवमूर्ती व कलश दर्शनासाठी ठेवण्यात येणार असून, भाविकांनी पितळी उंबऱ्याच्या बाहेरुन कलश व उत्सवमूर्तीचे दर्शन घेऊन, देवस्थान व्यवस्थापन समिती, पश्चिम महाराष्ट्र, कोल्हापूर यांना सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा देवस्थान व्यवस्थापन समितीचे प्रशासक अमोल येडगे यांनी केले आहे.
