6 टन पुरावे, 2700 साक्षीदार आणि 200 वकील
44 अब्ज डॉलर्सची फसवणूक प्रकरणी मृत्युदंड
हो ची मिन्ह
व्हिएतनामच्या ट्रुओंग माय लॅन यांना जगातील सर्वांत मोठ्या बँक फसवणूक प्रकरणात मृत्युदंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.व्हिएतनामच्या इतिहासातील ही पहिलीच घटना आहे. ट्रुओंग माय लॅन यांच्यावर 11 वर्षं देशातील सर्वांत मोठ्या बँकांपैकी एक असलेल्या सायगॉन कमर्शियल बँकेला लुटल्याचा आरोप आहे.लॅन यांनी बँकेकडून 44 अब्ज डॉलर्सचं कर्ज घेतलं होतं. वकील म्हणतात की, यापैकी 27 अब्ज डॉलर्स कधीही वसूल होणार नाहीत.
अधिकाऱ्यांनी माहिती देताना सांगितलं की, या प्रकरणाच्या तपासाचा भाग म्हणून 2,700 साक्षी नोंदवण्यात आल्या असून यात 10 सरकारी वकील आणि जवळपास 200 वकील सहभागी झाले होते.साक्षी पुरावे गोळा करण्यासाठी तब्बल 104 पेट्यांची गरज भासली. या कागदपत्रांचं वजन सुमारे सहा टन भरलं. ट्रुओंग माय लॅनसह, इतर 85 आरोपींवर दोषपत्र ठेवण्यात आलं असलं तरी त्यांनी आरोप फेटाळून लावले आहेत.
कम्युनिस्ट पक्षाचे सरचिटणीस गुयेन फु ट्रॉन्ग यांच्या नेतृत्वाखालील “ब्लॅझिंग फर्नेसेस” भ्रष्टाचारविरोधी मोहीम अनेक वर्षांपासून सुरू आहे. ट्रॉन्ग यांनी 2016 नंतर ही मोहीम अधिक तीव्र केली.या मोहिमेमुळे दोन अध्यक्ष आणि दोन उपाध्यक्षांना राजीनामा द्यावा लागला. शेकडो अधिकाऱ्यांना तुरुंगात टाकण्यात आलं.
आता देशातील सर्वात श्रीमंत महिला ट्रुओंग माय लॅन यांचं पितळ देखील उघडं पाडण्यात त्यांना यश मिळालं आहे.
.