कोवळी सकाळ पुस्तक म्हणजे आनंदाचा झरा:माधव जोशी
श्रीराम नानल यांच्या पुस्तकाचे उत्साहात प्रकाशन
सातारा
जीवनातील साध्या साध्या क्षणांमध्ये दडलेला निखळ आनंद शोधायला शिकवणारे, श्रीराम नानल लिखित ‘कोवळी सकाळ’ हे पुस्तक म्हणजे खऱ्या अर्थाने एक ‘आनंदाचा झरा’ आहे, असे प्रतिपादन टाटा टेली सर्व्हिसेसचे माजी अध्यक्ष तथा वर्तमान सल्लागार श्री. माधव जोशी यांनी येथे केले. चपराक प्रकाशनातर्फे प्रकाशित करण्यात आलेल्या आणि ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते व लेखक श्रीराम नानल यांच्या ‘कोवळी सकाळ’ या पुस्तकाचे प्रकाशन साताऱ्यात अत्यंत उत्साहात संपन्न झाले, त्याप्रसंगी ते मुख्य अतिथी म्हणून बोलत होते. सातारा जिल्हा ग्रंथ महोत्सव समितीचे कार्यवाह श्री. शिरीष चिटणीस हे या प्रकाशन समारंभाच्या अध्यक्षस्थानी होते.
मुख्य अतिथी श्री. माधव जोशी यांनी आपल्या मनोगतात पुस्तकाचा गौरव करतानाच, त्यांच्या आयुष्यात त्यांनी भेटलेल्या काही उत्तुंग व्यक्तिमत्त्वांच्या आठवणींना उजाळा दिला. १६ फेब्रुवारी १९८० रोजी जयपूर-दिल्ली रस्त्यावरील ‘हॉटेल मिडवे’ येथे आणि पुढे श्री. बापूराव लेले यांच्या सहस्रचंद्रदर्शन सोहळ्यात लाभलेली भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांची प्रत्यक्ष भेट, त्यांचा मृदू स्वभाव आणि लाभलेले अकृत्रिम सानिध्य याचे जोशी यांनी अत्यंत भावस्पर्शी वर्णन केले. याशिवाय भारतीय मजदूर संघाचे संस्थापक श्री. दत्तोपंतजी ठेंगडी यांच्याशी झालेली भेट, भारताचे माजी उपपंतप्रधान व बहुआयामी नेते यशवंतराव चव्हाण यांच्या समृद्ध आठवणी आणि उद्योगपती रतन टाटा यांच्या आठवणी सांगताना श्री. जोशी कमालीचे भावुक झाले होते.
प्रारंभी सर्व पाहुण्यांचे स्वागत झाल्यावर पुस्तकाचे लेखक श्रीराम नानल यांनी प्रास्ताविक केले. आपल्या लेखनाचा हेतू स्पष्ट करताना ते म्हणाले की, या पुस्तकातील व्यक्तिरेखा माझ्या दृष्टीने केवळ शब्दचित्रे नसून, ती माझ्या कृतज्ञ भावनेतून साकारलेली ‘स्मरणशिल्पे’ आहेत. दैनिक ‘प्रभात’ने हा सदरलेखन (स्तंभ) लिहिण्याची अमूल्य संधी दिली, याबद्दल त्यांनी दैनिक प्रभात आणि संपादक श्रीकांत कात्रे यांचे विशेष आभार मानले. क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि कविवर्य नारायण सुर्वे ही माझी श्रद्धास्थाने व दैवते आहेत, असे त्यांनी अत्यंत नम्रपणे नमूद केले. या पुस्तकात सावित्रीबाई फुले, यशवंतराव चव्हाण, नारायण सुर्वे, शोषितांचा आवाज उठवणारे अण्णाभाऊ साठे, अटलजी, दत्तोपंत ठेंगडी, अॅना फ्रँक यांच्यासह चित्रपटसृष्टी गाजवणारे अभिनेते-गायक किशोर कुमार, देव आनंद आणि राज कपूर अशा एकूण २४ प्रसिद्ध व कर्तृत्ववान व्यक्तींच्या जीवनप्रवासावर प्रकाश टाकणारे अभ्यासपूर्ण लेख समाविष्ट आहेत. हे सर्व लेख केवळ माहितीपर नसून, वाचकांच्या मनाला समृद्ध करणारे आहेत. या लेखांचा एकूणच समाजमनावर अत्यंत सकारात्मक आणि प्रगतीशील परिणाम होईल, असा विश्वास या प्रसंगी व्यक्त करण्यात आला.
चपराक प्रकाशनचे संचालक श्री. घनश्याम पाटील यांनी पुस्तक निर्मितीच्या प्रक्रियेवर प्रकाश टाकताना, लेखक श्रीराम नानल यांचे अनुभवविश्व अत्यंत समृद्ध असल्याचे सांगितले. मानवी मनाचे अचूक आकलन आणि सर्जनशीलता हीच नानल यांच्या समृद्ध लेखनाची मुख्य ताकद आहे, असे ते म्हणाले. ‘आम्ही पुस्तक प्रेमी समूहा’चे संस्थापक व पर्यावरणतज्ज्ञ डॉ. संदीप श्रोत्री यांनी पुस्तकातील विविध व्यक्तिरेखांचा धावता आढावा घेतला. किशोर कुमार, देव आनंद आणि राज कपूर यांच्यावरील लेखांचा संदर्भ देत, नानल यांचा चित्रपट या विषयाचा अभ्यास किती सखोल व व्यासंग दांडगा आहे, हे त्यांनी अधोरेखित केले. या पुस्तकातील रोज एक लेख जरी वाचला, तरी प्रत्येकाची सकाळ कमालीची प्रसन्न होईल आणि मनाला नवी उभारी व सकारात्मक ऊर्जा लाभेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
ज्येष्ठ पत्रकार आणि दैनिक प्रभातचे निवासी संपादक श्रीकांत कात्रे यांनी पुस्तकातील विषयांच्या वैविध्यावर अचूक बोट ठेवत नानल यांच्या लेखणीचे कौतुक केले. पुस्तकातील महाराष्ट्र राज्याच्या सर्वांगीण वैभवावर लिहिलेल्या दीर्घ लेखाचा त्यांनी विशेष गौरव केला आणि या विषयाचा लेखकाने पुढे आणखी विस्तार करावा, अशी मोलाची सूचना मांडली. श्री. नानल यांनी अत्यंत सखोल चिंतन, मनन आणि अभ्यास करून आपल्या लेखनाचा दर्जा उंचावला असून, त्याचा सुस्पष्ट परिणाम त्यांच्या प्रत्येक लेखात आणि भाषाशैलीत प्रकर्षाने जाणवतो, असे गौरवोद्गार त्यांनी काढले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री. शिरीष चिटणीस यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात वर्तमान काळातील वाचन संस्कृतीच्या स्थितीवर व तिच्या संवर्धनावर सखोल व उद्बोधक मार्गदर्शन केले. ‘कोवळी सकाळ’ सारखी पुस्तके समाजातील वाचन संस्कृतीची वृद्धी करण्यासाठी अत्यंत मोलाचे योगदान देतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तसेच, साताऱ्यातील कोणत्याही दर्जेदार साहित्य व संस्कृतीविषयक उपक्रमासाठी ‘दीपलक्ष्मी पतसंस्थे’चा हॉल सदैव उपलब्ध करून दिला जाईल, अशी महत्त्वपूर्ण ग्वाही त्यांनी दिली. श्री. नानल यांनी आता न थांबता आपली ही लेखनसंस्कृती अशीच अविरत सुरू ठेवावी आणि समाजाला अधिकाधिक पुस्तके द्यावीत, असा आपुलकीचा सल्लाही त्यांनी दिला. ग्रामीण भागातील प्रतिभावान लेखकांना तसेच नवलेखकांना चपराक प्रकाशन नेहमीच मोठे व्यासपीठ व उत्तेजन देत असते, याबद्दल त्यांनी संचालक घनश्याम पाटील यांच्या कौतुकास्पद कार्याचा विशेष उल्लेख केला.
याच सोहळ्याचे औचित्य साधून साहित्य आणि सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विविध मान्यवरांचा ‘आम्ही पुस्तक प्रेमी समूहा’तर्फे जाहीर गौरव करण्यात आला. यामध्ये महाराष्ट्र साहित्य परिषद, शाखा शाहूपुरी सातारा यांचा प्रतिष्ठेचा पुरस्कार मिळाल्याबद्दल ज्येष्ठ लेखिका अॅड. सीमंतिनी नुलकर व ज्येष्ठ लेखक सुभाष गुरव यांचा सन्मान करण्यात आला. तसेच प्लास्टिक मुक्ती चळवळीत अत्यंत सकारात्मक व सातत्यपूर्ण काम करणारे श्री. सोहम कुलकर्णी आणि पत्रकारिता क्षेत्रात आपल्या लेखणीचा विशेष ठसा उमटवणारे लेखक व पत्रकार श्री. सुनील शेडगे यांचाही मान्यवरांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला.
या दिमाखदार प्रकाशन समारंभास डॉ. श्याम बडवे, श्री. व सौ. चरेगावकर, क्षमा जोशी यांच्यासह सातारकर चोखंदळ वाचक व रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे नेटके व अत्यंत बहारदार सूत्रसंचालन सविता कारंजकर यांनी केले, तर उपस्थितांचे आभार ‘आम्ही पुस्तक प्रेमी समूहा’चे समन्वयक तथा पुस्तकाचे लेखक श्रीराम नानल यांनी मानले
फोटो ओळ
कोवळी सकाळ पुस्तकाचे प्रकाशन करताना श्री माधव जोशी, शिरीष चिटणीस, श्रीराम नानल तसेच डावीकडून
प्रमोद येवले, निखिल नानल, श्रीकांत कात्रे, डॉक्टर संदीप श्रोत्री,घनश्याम पाटील, उज्वला नानल आणि सविता कारंजकर

