कलेला प्रबोधनाची जोड दिली तर नवी पिढी संस्कारसंपन्न होईल
म्हाडा कॉलनीतील कार्यक्रमात यशेंद्र क्षीरसागर यांचे मत
सातारा
“कला हा सुंदर आणि अर्थपूर्ण जीवनाचा आत्मा आहे. ती समाजाला व्यापून उरणारी देणगी आहे. जर कलेला प्रबोधनाची जोड दिली तर नवी पिढी संस्कारसंपन्न होईल आणि भारत पूर्णतः खऱ्या अर्थाने माणुसकीप्रधान आणि प्रगत देश होईल,” असे प्रतिपादन प्रसिद्ध वक्ते यशेंद्र क्षीरसागर यांनी केले.
येथील म्हाडा कॉलनीमध्ये स्थानिक रहिवाशांच्या वतीने “प्रबोधन आणि भीमगीते” असा एकत्रित कार्यक्रम उत्साहात सादर करण्यात आला. स्थानिक नागरिक आणि कलाकार यांच्या संकल्पनेतून हा अभिनव प्रयोग करण्यात आला त्याला नागरिकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला. या विशिष्ट उपक्रमामुळे कलेला प्रबोधनाचे अधिष्ठान प्राप्त झाले.श्री क्षीरसागर तसेच माणिक कांबळे ,अश्विनी कांबळे आणि विलास जावळे यांनी अर्थपूर्ण भीमगीते सादर केली. या सादरीकरणादरम्यान श्री.क्षीरसागर यांनी महापुरुषांच्या जीवनाला केंद्रीभूत ठेवून प्रबोधन केले. महापुरुषांच्या जीवनातील संघर्ष अधोरेखित करणारे प्रसंग वर्णन केले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, माता रमाई आंबेडकर, महात्मा फुले अशा महान व्यक्तींचा जीवनपट त्यांनी सोप्या भाषेत उलगडून दाखवला. महान व्यक्तींचा काही घटना वगळता खऱ्या अर्थाने जीवन संघर्ष समाजापर्यंत विशेष करून नवीन पिढीपर्यंत पोहोचत नाही. त्यामुळे त्यांना इतिहासाचे गांभीर्य राहत नाही. त्यामुळे तरुण पिढीपर्यंत विचार पोहोचण्यासाठी कला आणि मनोरंजन या सोबत प्रबोधन गरजेचे आहे हे ओळखून हा अनोखा उपक्रम राबविण्यात आला. श्री क्षीरसागर यांनी महान व्यक्तींच्या योगदानाला अधोरेखित करणारे अनेक प्रसंग प्रभावी शैलीत व्यक्त केले. यावेळी शेकडो नागरिक लहान मुलांसह उपस्थित होते. केवळ मनोरंजन हे कलेचे प्रयोजन असू शकत नाही. अखेर समाजाला घडविण्यात कलेचेही योगदान गरजेचे आहे हेच या निमित्ताने अधोरेखित झाले.

