शालांतर्गत वक्तृत्व तसेच निबंध स्पर्धेचे पारितोषिक वितरण
नगरवाचनालय आणि हिंदवी रेडिओ यांच्यातर्फे आयोजन
सातारा:
येथील श्री छ प्रतापसिंह महाराज थोरले नगरवाचनालय आणि हिंदवी रेडिओ ८९.६ यांच्या संयुक्त विद्यमाने इयत्ता पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी मराठी भाषा संवर्धन पंधरवड्याच्या निमित्ताने फेब्रुवारी २०२६ मध्ये पर्यावरण,नागरी कर्तव्ये, कुटुंब व संस्कार इ. विषयांवर आधारित शालांतर्गत वक्तृत्व तसेच निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. इयत्ता पाचवी ते दहावी मधील विद्यार्थ्यांसाठी आयोजित या स्पर्धेत सातारा शहर व परिसरातील. शाळांनी सहभाग नोंदवला होता. यांचा पारितोषिक वितरण समारंभ नुकताच न्यू इंग्लिश स्कूल मधील उपक्रमशील शिक्षिका व लेखिका सौ सुवर्णा देशपांडे यांच्या हस्ते संपन्न झाला. यावेळी सौ देशपांडे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना व्यक्तिमत्त्व विकास,स़ंस्कार, संवाद यांचे महत्त्व अधोरेखित केले तसेच पालकांनी मुलांना वाढवताना आपलीही जबाबदारी ओळखून वागण्याचे आवाहन केले.सौ सुवर्णा देशपांडे यांचे हस्ते प्रत्येक शाळेतील प्रत्येक गटातील पहिल्या तीन विजेत्यांना प्रमाणपत्र व पुस्तक भेट देण्यात आली. सर्व सहभागी विद्यार्थ्यांना सहभाग प्रमाणपत्रे वितरित करण्यात आली.निबंध व वक्तृत्व स्पर्धेतील विजेत्यांना आपला निबंध व भाषण हिंदवी रेडिओ वरून सादर करण्याची संधी मिळणार आहे.
प्रारंभी हिंदवी रेडिओच्या वतीने श्री शेखर कुलकर्णी यांनी प्रास्ताविक केले. नगर वाचनालयाचे कार्यवाह श्री प्रकाश शिंदे यांनी पाहुण्यांचे स्वागत केले तसेच आभार मानले. न.वा.संचालक श्री अतुल शालगर, डॉ संदीप श्रोत्री, समिती सदस्या श्रीमती सुषमा भिडे तसेच विद्यार्थी,पालक व शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.
नगरवाचनालय साताऱ्याच्या वतीने उन्हाळी सुट्टीतील मोफत बालवाचन उपक्रमाची सुरुवात दि.२५ एप्रिल पासून होत आहे. त्याचा विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने लाभ घ्यावा असे आवाहन वाचनालयाच्या वतीने करण्यात आले आहे

