सुनेत्रा पवार महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री


लोकभवनात साधेपणाने शपथविधी संपन्न

मुंबई
सुनेत्रा अजित पवार यांनी आज लोकभवनाच्या दरबार हॉलमध्ये उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यांच्या रुपाने महाराष्ट्राला राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री लाभल्या आहेत. राज्याचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी त्यांना गोपनियतेची शपथ दिली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला. यावेळी ‘अजितदादा अमर रहे’च्या घोषणा देण्यात आल्या.

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख अजित पवार यांच्या अकाली निधनामुळे महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर मोठी पोकळी तयार झाली आहे.त्यांच्या जाण्यानंतर आता उपमुख्यमंत्रिपदी त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना निवडण्यात यावं, अशा मागणी झाली. यानंतर आज (31 जानेवारी) दुपारी 2 वाजता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विधिमंडळ सदस्यांची बैठक पार पडली या बैठकीत त्यांची पक्षाच्या विधीमंडळ पक्षनेतेपदी निवड करण्यात आली. यानंतर लगेचच शपथविधी होणार असल्याची माहिती देण्यात आली होती. त्यानुसार संध्याकाळी 5 वाजता हा सोहळा पार पडला आहे.
विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत दोन ठराव मंजूर करण्यात आले. यात सुनेत्रा पवार यांची विधिमंडळ नेतेपदी निवड झाली असून आणि, विधिमंडळातले सर्वाधिकार सुनेत्रा पवार यांच्याकडे असणार आहे.बैठकीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे ठरावाचं पत्र देण्यात आलं
दरम्यान, एकीकडे, शरद पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते ‘विलीनीकरणाची इच्छा अजित पवार यांची होती आणि आम्हाला या शपथविधीबाबत कोणतीही कल्पना नसल्याची’ विधानं करत आहेत तर दुसऱ्या बाजूला अजित पवार यांच्या राष्ट्रवादीतील नेते विलीनीकरणाच्या प्रश्नांवर बोलणं टाळताना दिसत आहेत
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते आणि आमदार रोहित पवार यांनी या घडामोडीवर सोशल मीडियावर पोस्ट करत प्रतिक्रिया दिली.’राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून मा. सुनेत्राकाकी यांनी शपथ घेतली, याचा आनंद आहे. खरं म्हणजे मा. अजितदादांची जागा कुणीच घेऊ शकत नाही पण किमान सुनेत्राकाकींच्या रुपात तरी आम्ही तिथं अजितदादांना पाहू!डोक्यावर डोंगराएवढं दुःख असताना आणि आम्ही सर्वजण शोकाकूल असताना त्यांना शुभेच्छा तरी कशा द्याव्यात, हे कळत नाही!’ अशी प्रतिक्रिया रोहित पवार ‘एक्स’वर केलेल्या पोस्टच्या माध्यमातून दिली.
सुनेत्रा पवार यांचा परिचय
सुनेत्रा पवार यांचा जन्म १८ ऑक्टोबर १९६३ रोजी तेर (जि. धाराशिव) याठिकाणी झाला. माजी मंत्री पद्मसिंह पाटील यांची बहीण असलेल्या सुनेत्रा पवार यांना राजकीय वारसा जन्मतःच लाभलेला होता. १९८५ मध्ये त्यांचा विवाह अजित पवार यांच्यासोबत झाला. लग्नानंतर काटेवाडी (ता. बारामती) येथे आल्यावर त्यांनी सामाजिक कार्याला सुरूवात केली. काटेवाडीमध्ये ग्रामस्वच्छता चळवळीची मुहूर्तमेढ त्यांनी रोवली. अगदी पहाटे पासून स्वतः हातात खराटा घेऊन कामाला सुरुवात करणाऱ्या सुनेत्रा पवार यांनी संपूर्ण गावालाच या अभियानात सहभागी केलं. त्यांच्या या प्रेरणेतून ग्रामस्वच्छता अभियानात काटेवाडी राज्यात प्रथम क्रमांकावर आलं. या कार्याची दखल घेत देश-विदेशातून अभ्यासकांनी काटेवाडीला भेट दिली. याच कामामुळं सुनेत्रा पवार यांना सार्क देशांच्या साकोसान परिषदेत सहा राष्ट्रप्रमुखांसमोर भाषण करण्याची संधी मिळाली आणि त्यांच्या सामाजिक कार्याला सुरूवात झाली.
बारामतीमध्ये ‘एनव्हायर्नमेंट फोरम ऑफ इंडिया’च्या माध्यमातून मोतीबिंदू शस्त्रक्रिया, वृक्षारोपण, ओढा खोलीकरण, महिलांमध्ये कर्करोगाविषयी जागृती आदी उपक्रम सुनेत्रा पवारांनी राबवले. या सर्व उपक्रमांमध्ये त्यांचा सक्रिय आणि नेतृत्वात्मक सहभाग राहिला. बारामती टेक्सटाईल पार्कच्या अध्यक्षपदाच्या माध्यमातून त्यांनी हजारो महिलांना रोजगार मिळवून दिला.अजित पवार यांच्या राजकीय वाटचालीत आपली घरं सांभाळणे, नातेसंबंध जपणं, सामाजिक कार्य करणं, कठीणप्रसंगी दादांना साथ देणं आणि सल्लामसलत करणं, ही जबाबदारी त्यांनी पार पडली. सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेताच त्यांच्या नावावर आज पहिली महिला उपमुख्यमंत्री असा एक मोठा विक्रम झाला आहे. या आधी कोणत्याही महिलेने या पदावर काम केलेले नाही.

Advertisement

राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत सुनेत्रा पवार यांचा प्रत्यक्षामध्ये राजकारणात प्रवेश झाला. त्यापूर्वी पवार कुटुंबातील प्रत्येक निवडणुकीवेळा त्या उत्साहाने प्रचारात उतरत असत आणि बारामतीमध्ये आत्तापर्यंत मिळालेल्या अनेक विक्रमी विजयांमध्ये त्यांचा मोलाचा वाटा राहिला. पक्षफुटीनंतर सुप्रिया सुळेंविरोधात त्या लोकसभा निवडणुकीत उतरल्या आणि त्यांना पराभव पत्करावा लागला, यानंतरही त्या खचल्या नाहीत.त्या जनसेवेत सक्रिय राहिल्यानंतर त्यांना राज्यसभेवर पाठवण्यात आले. राज्यसभा खासदार म्हणून काम करत असतानाच त्यांना तालिका अध्यक्षपदाची जबाबदारी मिळाली आणि देशाच्या सर्वोच्च सभागृहाच्या अध्यक्ष आसनावर विराजमान होण्याचा मान मिळाला. आता अजित पवारांच्या निधनानंतर सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!