अश्वमेध ग्रंथालयात भैरप्पा यांना श्रध्दांजली
सातारा
अश्वमेध ग्रंथालयात ज्येष्ठ साहित्यिक भैरपा यांना श्रध्दांजली अर्पण करण्यात आली . यावेळी ग्रंथालयाचे संस्थापक डॉ रविंद्र भारती , अध्यक्ष साहित्यिक डॉ राजेंद्र माने , कार्याध्यक्ष शशिभूषण जाधव , संचालक प्रा श्रीधर साळुंखे , आनंद ननावरे, गौतम भोसले , निलेश भोसले , संजय साबळे, रोहिणी कुंदप उपस्थित होते .
श्रध्दांजली अर्पण करताना डॉ राजेंद्र माने म्हणाले,भैरप्पा हे भारतीय लेखक होते . त्यांनी कन्नड मधून लेखन केले असले तरी त्यांचे सर्व साहित्य बऱ्याच भाषेत अनुवादित झालेले आहे . जुन्या काळाचा भवताल ,तिथली माणसे ,लोकसंस्कृती या सर्वांचं प्रतिबिंब त्यांच्या साहित्यात आहे.पर्वसारखी महाभारतावरील कादंबरीत त्यांनी चमत्कार टाळून सर्व पात्रांचे मानुषीय पद्धतीने मानसिक विश्लेषण केले आहे .ते खूप महत्त्वाचे आहे.आवरण सारखी त्यांची कादंबरी साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त करून गेली. त्याच्या जवळपास 34 आवृत्ती निघाल्या.वंशवृक्ष ,तंतू ,मंद्र,काठ,साक्ष यासारख्या त्यांच्या कादंबऱ्या लोकप्रिय झाल्या.
साहित्य अकादमी, पद्मश्री, पद्मभूषण, सरस्वती सन्मान असे मानाचे सर्व पुरस्कार त्यांना प्राप्त झाले. त्यांचे सर्व साहित्य नविन पिढीतल्या लेखकांना मार्गदर्शक ठरणारे आहे . ‘
डॉ रविंद्र भारती म्हणाले ‘भैरप्पा सारखे कादंबरीकार साहित्यातले अमोल लेण्यासारखे आहेत . त्यांचे साहित्य सर्व वाचकांनी आवर्जून वाचायला पाहिजे
असे आहे . ‘
प्रा श्रीधर साळुंखे म्हणाले ‘भैरप्पा यांच्या साहित्याला अध्यात्मिक बैठक आहे . उमा कुलकर्णी यांनी भैरप्पा यांचे साहित्य मराठीत अनुवादित केले आहे . मंद्र सारखी त्यांची कादंबरी शास्त्रीय संगीतावर आधारित आहे . ‘
यावेळी भैरप्पा यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून श्रध्दांजली अर्पण करण्यात
आली .

