सत्संग कार्यक्रमात चेंगराचेंगरी,100 लोक मृत्युमुखी


उत्तर प्रदेशमधील हाथरसमध्ये दुर्घटना

हाथरस

उत्तर प्रदेशमधील हाथरसमध्ये मन सुन्न करणारी दुर्घटना घडली आहे. एका गावामध्ये आयोजित भोलेबाबा प्रवचनादरम्यान चेंगराचेंगरीची घटना घडली आहे. या दुर्घटनेमध्ये आतापर्यंत १०० जणांचा मृत्यू झाला आहे.या अपघातात शंभरापेक्षा जास्त भाविकांचा मृत्यू झाल्याची भिती व्यक्त केली जात आहे. प्रवचन संपल्यानंतर भाविक निघाले होते. त्याचवेळी ही दुर्घटना घडली. जखमींना तातडीने शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. हाथरस जिल्ह्यातील सिकंदराराऊ भागात फुलाई गावात भोलेबाबा प्रवचनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या प्रवचन सोहळ्यासाठी मोठ्या संख्येनं भाविक उपस्थितीत होते. आधीच पावसाने पाठ फिरवल्यामुळे परिसरात प्रचंड उकाडा होता. जेव्हा कार्यक्रम संपला तेव्हा मोठ्या संख्येनं भाविक घराकडे निघाले होते. पण त्यावेळी अचानक एकच गोंधळ उडाला. त्यामुळे चेंगराचेंगरी झाली. या चेंगराचेंगरीमध्ये १०० जणांचा मृत्यू झाला आहे. तर शेकडो भाविक जखमी झाले आहे. एटा शासकीय रुग्णालयामध्ये आतापर्यंत 27 जणांचे मृतदेह पोहोचले आहे. यामध्ये 23 महिला आणि ३ मुलं आणि एक पुरुषाचा समावेश आहे. अजूनही जखमी भाविकांना रुग्णालयात दाखल केलं जात आहे. मृत भाविकांची ओळख पटवली जात आहे.जेव्हा ही चेंगराचेंगरी घडली एका प्रत्यक्षदर्शी चिमुरडीने याबद्दल माहिती दिली. ‘प्रवचनाला मोठ्या संख्येनं गावातील लोक आली होती. प्रवचन संपल्यानंतर भाविक घराकडे जात होते. पण गर्दीतून लवकर बाहेर पडण्यासाठी लोकांची गर्दी झाली. त्यामुळे एकच गोंधळ उडाला. काही महिला या खाली पडल्या. त्यांच्यासोबत काही लहान मुलंही पडली. पण तरीही लोक थांबली नाही. महिला आणि चिमुरड्यांच्या अंगावर पाय ठेवून पुढे जात होती. त्यांना वाचवण्यासाठी तिथे कुणीच आलं नाही. चेंगराचेंगरीत सापडलेल्या महिला आणि मुलांनी मदतीसाठी एकच आक्रोश केला होता. पण, कुणी मदतीला पुढे आलं नाही’, असं या प्रत्यक्षदर्शी चिमुरडीनं सांगितलं.

Advertisement

इतक्या मोठ्या संख्येनं आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाचा पोलिसांना माहिती दिली नव्हती का, असा सवाल आता उपस्थितीत होत आहे. आयोजकांनी जेव्हा प्रवचनाचा कार्यक्रम ठेवला होता, याबद्दल पोलिसांची परवानगी घेतली होती का? जर आयोजिकांनी पोलिसांना माहिती दिली असेल तर पोलिसांचा बंदोबस्त नव्हता का? गर्दी रोखण्यासाठी पोलीस तिथे नव्हते का? प्रवचन सोहळ्यात गेट बंद होता तर तो कुणाच्या सांगण्यावर उघडण्यात आला, असे प्रश्न आता उपस्थितीत केले जात आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!