राष्ट्रपती, पंतप्रधानांना ७५ लाख पत्रे पाठवणार


डॉ. आंबेडकर विद्यार्थी दिवसासाठी व्यापक अभियान

सातारा :
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी ७ नोव्हेंबर १९०० रोजी छ. प्रतापसिंह महाराज हायस्कूल येथे प्रवेश घेतला. हा शाळा प्रवेश दिन ‘विद्यार्थी दिवस’ म्हणून राज्यभर साजरा व्हावा यासाठी १७ वर्षे महाराष्ट्र सरकारकडे आग्रह धरला. या आग्रहानुसार शासनाने ६ वर्षापूर्वी हा दिवस ‘विद्यार्थी दिवस’ म्हणून घोषित केला. त्यानंतर हा विद्यार्थी दिवस देशभर होण्यासाठी दिल्ली दरबारी शर्थीचे प्रयत्न सुरु ठेवले. आता अधिकृत अधिसूचना काढण्यासाठी राष्ट्रपती आणि पंतप्रधान यांना ७५ लाख पत्रे पाठवणार असून याची सुरूवात डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातून करणार असल्याची माहिती डॉ. बाबासाहेब आंबेडकर शाळा प्रवेश दिन तथा विद्यार्थी दिवसाचे प्रवर्तक अरुण जावळे यांनी दिली.

संभाजीनगर येथील मिलिंद महाविद्यालयाच्या स्थापनेदरम्यान डॉ. बाबाससाहेब आंबेडकरांनी ‘शिक्षण हे वाघीनीचे दूध आहे आणि तो जो कोणी प्राशन करेल तो गुरगुरल्याशिवाय राहाणार नाही’ असे विधान केले होते. या विधानाला ७५ वर्षे होत आहेत. याचे औचित्य साधून विद्यार्थी दिवसाची चळवळ अधिक व्यापक करणार आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात यासंदर्भात विद्यार्थ्यांशी संवाद झाला असल्याचे स्पष्ट करून अरुण जावळे पुढे म्हणाले यापूर्वी पहिल्या टप्यात महाराष्ट्रातून १ लाख २५ हजार पत्रे दिल्लीला पाठवण्याची मोहीम राबवली होती. या मोहीमेचा परिणाम म्हणून महामहिम राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी ७ नोव्हेबर हा दिवस भारतभर साजरा करण्यासंदर्भात सहमती दर्शवली. तथापि अधिसूचना निघण्यापूर्वीच त्यांचा कार्यकाल संपला. त्यामुळे विद्यमान राष्ट्रपती द्रौपदी मूर्म आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुन्हा (पत्र मोहीमेच्या दुसऱ्या टप्यात) या ७५ लाख पत्रांच्या माध्यमातून साद घालणार आहे.

Advertisement

सिम्बॉल आॕफ नॉलेज म्हणून ज्यांना जगात संबोधले जाते आणि जगातला सर्वात हुशार विद्यार्थी म्हणून ज्यांची ओळख आहे असे डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे छ. प्रतापसिंह महाराज हायस्कूलचे विद्यार्थी होत. त्यामुळे या हायस्कूलला अनन्यसाधारण महत्व आहे. आजही या हायस्कूलच्या प्रवेश अभिलेखात डॉ. आंबेडकरांचे नाव भीवा रामजी आंबेडकर असे असून १९१४ क्रमांकाला तशी नोंद आहे. खरेतर, प्रवेश घेताना या शाळेच्या मनाला आणि तेथील मातीच्या कणाला पूसटशी कल्पनासुध्दा नसेल की हा बाल भीवा भविष्यात जगातला आदर्श विद्यार्थी ठरेल. परंतु हे सारं भीवाने आपल्या विलक्षण प्रतिभेच्या जोरावर खरं ठरवले. या सातारच्या मातीमुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर नावाचा प्रज्ञासूर्य जगाला मिळाला. या हायस्कूलमध्ये त्यांचे पाऊल पडले आणि याच मातीतून प्रज्ञेच्या, विद्वत्तेच्या अवकाशात उंच भरारी घेण्याचे बळसुध्दा त्यांना प्राप्त झाले. त्यामुळे छत्रपती प्रतापसिंह महाराज हायस्कूल हे केवळ सातारकरांचे नाही तर या जगाचे आज प्रेरणास्थान ठरलेलं आहे.

डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या नावाने शिक्षक दिन व डॉ. अब्दूल कलाम यांच्या नावाने वाचक दिन देशभर साजरा केला जातो, तसा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने संपूर्ण भारतात विद्यार्थी दिवस का साजरा व्हायला नको ? असा प्रश्न उपस्थित करून अरुण जावळे यांनी म्हटले आहे की, खरंतर, समाजाला जबरदस्त प्रेरणा आणि चालना देण्याच्या दृष्टीने तसेच शालेय शिक्षण चळवळ अधिक गतिमान करण्याच्या हेतूने ७ नोव्हेंबर. डॉ.बाबासाहेब आंबेडकर शाळा प्रवेश दिन म्हणजेच ‘विद्यार्थी दिवस’ हा अत्यंत महत्वाचा ऊर्जादायी दिवस आहे. नवा, समृध्द, शक्तिशाली भारत उभा करायचा असेल, तमाम गोरगरिबबांच्या, दलित- वंचितांच्या आणि एकूणच सर्व समाजाच्या नव्या पिढीला शिक्षणाच्या मुख्य धारेत आणायचे असेल तसेच एकही मूल शिक्षणापासून वंचित राहणार नाही हे पहायचे असेल तर विद्यार्थी दिवस भारतभर होणं महत्त्वाचे आहे, असे स्पष्ट करत सातारचा हा विद्यार्थी दिवस भारतभर होईपर्यंत स्वस्थ बसणार नसल्याचेही साहित्यिक अरुण जावळे यांनी म्हटले आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!