ठाकरे,पवारांबाबत सहानुभूती
छगन भुजबळ यांचे निरीक्षण
मुंबई: राज्यात शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्याबद्दल सहानुभूतीची लाट आहे. यंदाची निवडणूक एनडीएसाठी सोपी नसेल, असं मत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केलं आहे.
‘शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्याबद्दल जनमानसात सहानुभूती आहे. त्यांच्याबद्दल असलेली सहानुभूतीची लाट त्यांच्या भाषणांसाठी असलेल्या गर्दीतून दिसून येत आहे. पण तरीही लोकांचा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदींवर आहे. देशात मजबूत सरकार असावं अशी लोकांची इच्छा आहे,’ असं भुजबळ म्हणाले.
भाजपनं दिलेल्या अब की बार ४०० बार घोषणेवरही त्यांनी भाष्य केलं. ‘संविधान बदलण्यासाठी ४०० पेक्षा अधिक जागा एनडीएला हव्या आहेत, असा प्रचार केला जात आहे. लोकांच्या मनात काही प्रमाणात शंका आहे. भाजपचे कर्नाटकातील खासदार अनंतकुमार हेगडे यांनीही संविधान बदलाबद्दल विधान केलं आहे,’ याकडेही भुजबळ यांनी लक्ष वेधलं.
संविधान सशक्त आहे. त्यात कोणतेही बदल केले जाणार नाहीत, याची ग्वाही खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिली आहे. पण तरीही विरोधकांकडून याबद्दलचा प्रचार जोरकसपणे केला जात आहे. याचा परिणाम नेमका काय होणार ते निकालाच्या दिवशीच कळेल, असं भुजबळ म्हणाले.
