पतंजलीवर पुन्हा कारवाई
बिस्कीटाचे वजन कमी भरल्याने सव्वा लाखाचा दंड
मुंबई
बाबा रामदेव यांच्या पतंजली कंपनीविरोधात वजन नियामक विभागाकडून बिस्कीटाचे वजन कमी भरल्याने कारवाई करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे.या प्रकरणात कंपनीला सुमारे सव्वा लाखांचा दंड ठोठावण्यात आला आहे. इंदूर येथील डी-मार्टमध्ये हे प्रकरण उघडकीस आले. गतवर्षी नोव्हेंबर महिन्यात महेंद्र जाट नावाच्या एका ग्राहकाने कनाडिया येथील डी मार्ट या स्टोअरमधून 800 ग्रॅमचा पतंजलीचा बिस्कीटाचा पुडा खरेदी केल होता. या बिस्कीटाच्या पुड्यासाठी जाट यांनी 125 रुपयेही मोजले होते.मात्र, बिस्कीटाचा पुडा खरेदी केल्यानंतर शंका आल्याने जाट यांनी संबंधित पुड्याचे वजन केले. त्यावेळी वजनाबाबत त्यांना शंका आल्याने त्यांनी ग्राहक न्यायालयाला तक्रार केली. त्यावेळी हे प्रकरण ग्राहक समिती न्यायालयाने वजन नियामक विभागाकडे सोपवले.
त्यानंतर वजन नियामक विभागाने या बिस्कीटाच्या पुड्याची अधिक तपासणी केली. या तपासणीनंतर 800 ग्रॅम असे छापील वजन असणाऱ्या पुड्याचे वजन प्रत्यक्षात 746.70 ग्रॅम इतकेच होते. पुड्याचं वजन तब्बल 53 ग्रॅमने कमी भरले होते. त्या 53 ग्रॅमची साधारण किंमत 7 रुपये इतकी होती. परिणामी, विभागाने पतंजली आणि डी-मार्टला नोटीस बजावण्यात आली. त्यानंतर त्यांनी वजन कमी असल्याचे मान्य केले. त्यामुळे विभागाने पतंजली कंपनीवर 1 लाख 20 हजार रुपयांचा तर डीमार्टवर 20 हजार रुपयांचा दंड ठोठावला.
