यशोदामध्ये रेव्हिट सॉफ्टवेअर विद्यार्थी विकास प्रशिक्षण कार्यक्रम


सातारा
यशोदा टेक्निकल कॅम्पस, सातारा येथील पॉलिटेक्निक विभागाच्या स्थापत्य अभियांत्रिकी रेव्हिट सॉफ्टवेअर वरील एक आठवड्याचा विद्यार्थी विकास प्रशिक्षण कार्यक्रम ऑटोकॅड प्रयोगशाळेत यशस्वीपणे आयोजित करण्यात आला. हा कार्यक्रम स्ट्रक्चरल इंजिनिअरिंग अकॅडमी (SEA), कराड यांच्या सहकार्याने तसेच सिव्हिल इंजिनिअरिंग स्टुडंट्स असोसिएशन (CESA) यांच्या सहभागातून आयोजित करण्यात आला.

या प्रशिक्षण कार्यक्रमाचा उद्देश विद्यार्थ्यांना बिल्डिंग इन्फॉर्मेशन मॉडेलिंग (BIM) तंत्रज्ञानाची ओळख करून देत उद्योगाभिमुख कौशल्ये विकसित करणे हा होता. प्रशिक्षणादरम्यान विद्यार्थ्यांनी रेव्हिट सॉफ्टवेअरच्या माध्यमातून इमारतीचे 3D मॉडेलिंग, प्लॅन, सेक्शन व एलिव्हेशन तयार करणे तसेच आधुनिक बांधकाम डिझाईन पद्धतींचे प्रत्यक्ष ज्ञान आत्मसात केले. स्ट्रक्चरल इंजिनिअरिंग अकॅडमीच्या तज्ज्ञ प्रशिक्षकांनी विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष मार्गदर्शन करत सॉफ्टवेअरचे सखोल प्रशिक्षण दिले.
प्रशिक्षणाच्या शेवटी सर्व विद्यार्थ्यांची कौशल्य चाचणी घेण्यात आली. प्रशिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांचा प्रमाणपत्र वितरण समारंभ आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमास सेंट्रल अकॅडमिक कोऑर्डिनेटर, सर्व विभागप्रमुख, स्ट्रक्चरल इंजिनिअरिंग अकॅडमीचे संचालक तसेच स्थापत्य अभियांत्रिकी विभागाचे प्राध्यापक उपस्थित होते. यावेळी यशस्वी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले.

Advertisement

हा कार्यक्रम मा. डॉ. दशरथ सगरे , अध्यक्ष, यशोदा शिक्षण संस्था, उपाध्यक्ष प्रा. डॉ. अजिंक्य सगरे यांच्या प्रेरणेतून आयोजित करण्यात आला. कार्यक्रमाचे आयोजन प्रा. पी. के. जाधव व विभागप्रमुख प्रा. पी. एस. मतकर यांच्या समन्वयातून, प्राचार्य डॉ. विक्रम एस. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच संस्थेचे कुलसचिव डॉ. गणेश सुरवसे व सहसंचालक डॉ. रणधीरसिंह मोहिते यांच्या सहकार्याने यशस्वीरीत्या पार पडले. संस्थेचे उपाध्यक्ष डॉ. अजिंक्य सगरे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत भविष्यातही अशा विद्यार्थीपूरक कौशल्य विकास कार्यक्रमांचे आयोजन सातत्याने करण्यात यावे असे आवाहन केले तसेच प्रशिक्षणामध्ये सक्रिय सहभाग नोंदविणाऱ्या विद्यार्थ्यांचे कौतुक केले.

विद्यार्थ्यांनी या प्रशिक्षणाबाबत उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदविला असून आधुनिक बांधकाम तंत्रज्ञान समजण्यासाठी हा कार्यक्रम अत्यंत उपयुक्त ठरल्याचे मत व्यक्त केले. भविष्यातही अशा कौशल्याधारित व उद्योगाभिमुख कार्यक्रमांचे आयोजन करण्याचा विभागाचा मानस आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!