वारकऱ्यांच्या बसला भीषण अपघात, 5 जणांचा मृत्यू
सोलापूर
मुंबई पुणे महामार्गावर पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांचा ट्रॅव्हल्सच्या बसला भीषण अपघात झाला आहे. ही ट्रॅव्हल्स डोंबिवलीवरून पंढरपूरकडे निघाली होती.या ट्रॅव्हल्समध्ये एकूण 54 वारकरी प्रवास करत होते. या अपघातात 5 जणांचा मृत्यू झाला आहे तर इतर ८ वारकरी गंभीर जखमी झाले आहे.
आषाढी एकादशीसाठी राज्यभरातून पालख्या पंढरीकडे मार्गक्रमण करत आहेत. सोमवारी रात्री डोंबिवलीवरुन एक पालखी निघाली.ट्रॅव्हल्सने निघालेल्या या पालखीचा भीषण अपघात झाला आहे. मुंबईहून वारकरी पंढरीच्या दिशेनं निघाले होते. पण वाटेतच त्यांच्यावर काळानं घाला घातला.
रात्री एक वाजण्याच्या सुमारास मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवरुन ट्रॅव्हल्स पंढरपूरच्या दिशेनं जात असताना भीषण अपघात झाला. वारकऱ्यांच्या बससमोर एक ट्रॅक्टर जात होता. ट्रॅव्हल्सवरचा चालकाचा ताबा सुटला आणि पुढे जाणाऱ्या ट्रॅक्टरवर ट्रॅव्हल्स जाऊन आदळली. पुढे ट्रॅव्हल्स अनिंयंत्रित होऊन थेट 30 ते 40 फूट खड्ड्यात जाऊन पडली. यावेळी ट्रॅव्हल्समध्ये 54 वारकरी होते. यातील 5 जणांचा जागीच मृत्यू झाला. तर 8 जण गंभीर जखमी झाले आहेत. काही प्रवाशांना किरकोळ दुखापत झाली आहे. दरम्यान या अपघातांची माहितीमिळताच पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. येथे बचावकार्य सुरू करण्यात आलं. सर्व जखमींना एमजीएम रूग्णालय आणि पनवेलच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलं. सर्व जखमींवर सध्या उपचार सुरू आहेत. दरम्यान, एक्सप्रेसवेवर ट्रॅक्टरला बंदी असतानाही ट्रॅक्टर एक्सप्रेसवेवर आलाच कसा? पोलीस यंत्रणा कार्यरत नाही का? असा सवाल सध्या उपस्थित होत आहे
