भांबवली वजराई धबधबा हंगाम सुरू
देशातील सर्वात उंच धबधबा पर्यटकांचे आकर्षण
सातारा
हजारो पर्यटकांचे लक्ष वेधणारा भारतातील सर्वात उंचीचा भांबवली वजराई धबधब्याचा हंगाम शुक्रवारपासून सुरू झाला आहे. भांबवली वजराई धबधबा आता पर्यटन विकासासाठी सज्ज झाला आहे.भांबवली वजराई धबधब्याला २०१८ मध्ये ‘क’ वर्ग पर्यटनस्थळ म्हणून मान्यता मिळून धबधब्याच्या विकासाचे काम सुरू झाले. घनदाट जंगल, दुर्गम डोंगरातून जाताना पर्यटकांना कसरत करावी लागायची. पहिल्या टप्प्यातील पायऱ्या, रेलिंगच्या कामामुळे डोंगरातून घसरगुंडीची समस्या दूर झाली आहे. दुसऱ्या टप्प्यात वाॅच टाॅवर व पॅगोडाचे काम झाले असून, निसर्गाचा मनमुराद आनंद लुटता येत आहे. तिसऱ्या टप्प्यातील बांबू (गेस्ट) हाऊसचे काम पूर्ण झाले असून, पर्यटकांना निसर्गाच्या सानिध्यात राहण्याचा आनंद मिळेल. परिसर डोंगराळ असून, घनदाट झाडीचा असल्यामुळे पर्यटकांना चालताना कसरत करावी लागते. विशेष करून वयस्कर पर्यटकांची मागणी होती की चालण्यासाठी सोयीस्कर पायवाट व्हावी.आता जांभ्या दगडाची पायवाट झाली आहे.
पर्यटक हिरव्यागर्द झाडीतील धुवाँधार पावसाचा व धबधब्याचा थ्रिलिंग अनुभव घेण्यासाठी जुलै, ऑगस्ट महिन्यांत भांबवली वजराई धबधब्याला भेट देतात. भांबवलीतील सध्याचे वातावरण मनमोहक असून, धुवाँधार पावसाच्या सरी, गार-गार वारा, रानकिड्यांचे आवाज, हिरवी गर्द झाडी, धबधब्याच्या पाण्याचा प्रचंड प्रपात, निसर्गाचा खुललेला नजारा पाहून मन प्रफुल्लित होत आहे.
