वेदगंगा नदीत बुडून चौघांचा मृत्यू
यात्रेसाठी आलेल्यांवर काळाचा घाला
कोल्हापूर
कागल तालुक्यातील आनूर- बस्तवडे बंधारा येथे यात्रेसाठी आलेल्या चौघांचा वेदगंगा नदीत बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. आज दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. बुडालेल्यांपैकी तीन जणांचे मृतदेह स्थानिकांच्या मदतीने बाहेर काढण्यात यश आलं आहे. तर एकाची शोध मोहिम अद्याप सुरू आहे. आणुर गावाच्या यात्रेसाठी जितेंद्र विलास लोकरे (वय ३६, मुरगूड), सौ. रेश्मा दिलीप येळमल्ले (वय ३४, अथणी, कर्नाटक), सौ. सविता अमर कांबळे (वय २७ रुकडी), यश दिलीप येळमल्ले (वय १७, अथणी, कर्नाटक) हे आपल्या पाहुण्यांच्या घरी आले होते. आज दुपारी तीनच्या सुमारास वेदगंगा नदीवर कपडे धुण्यासाठी गेले असताना या चौघांचा नदीत बुडून मृत्यू झाला.
ग्रामस्थांनी त्वरित नदीवर दाखल होत मृतदेह शोधण्याचं काम सुरू केलं. यावेळी दोन महिलांसह एकाचा मृतदेह नदीतून बाहेर काढण्यात ग्रामस्थांना यश आलं. मात्र यश दिलीप येळमल्ले याचा मृतदेह अद्याप मिळाला नसल्याने गावकऱ्यांकडून शोध मोहिम सुरू आहे.
दरम्यान, दुपारी तीनच्या सुमाराला घडलेल्या या दुर्घटनेची माहिती पालकमंत्री हसन मुश्रीफ यांना देण्यात आली. मंत्री हसन मुश्रीफ हे सध्या परदेश दौऱ्यावर आहेत. त्यांनी स्पेनमधून त्यांनी तातडीने जिल्हाधिकारी अमोल येडगे आणि तहसीलदार अमर वाकडे यांच्याशी संपर्क साधला.चौथा मृतदेह मिळत नसल्यामुळे त्याच्या शोध कार्यासाठी तातडीने आपत्ती व्यवस्थापनाच्या रेस्क्यू टीम नदीकडे पाठवण्याच्या सूचना केल्या आहेत. तसंच मुख्यमंत्री सहाय्यता निधीमधून या सर्व मृतांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत मिळण्यासाठी तातडीने प्रस्ताव करण्याच्या सूचनाही पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिल्या आहेत.
