नोव्हेंबरचे पैसे ऑक्टोबरमध्येच देणार
सरकारची लाडक्या बहिणींना भाऊबीजेची ओवाळणी
मुंबई
‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेच्या माध्यमातून सरकारकडून महिलांना दर महिन्याला १५०० रुपये देण्यात येतात. या योजनेत आतापर्यंत कोट्यवधी महिलांनी अर्ज केले आहेत.आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आचारसंहिता लागण्यापूर्वीच लाडकी बहीण योजनेतील नोव्हेंबर महिन्याच्या हप्ताचे पैसे आताच ऑक्टोबर महिन्यात देणार असल्याचा मानस राज्यातील महायुती सरकारचा आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींची दिवाळी ऑक्टोबरलाच साजरी होणार असून, भाऊबीजेच्या ओवाळणीचे पैसे काही दिवसांतच मिळणार असल्याचे सांगितले जात आहे.
लाडकी बहीण योजनेसाठी पहिल्यांदा ३ हजार रुपये दिले आहेत. आता सप्टेंबर महिन्याचे १५०० रुपये मिळाले आहेत. बहिणींनी काही काळजी करु नये. ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्याचे पैसे १० ऑक्टोबरच्या आधी, भाऊबीजेची ओवाळणी बहिणींच्या खात्यात जाणार आहे, हा शब्द तुम्हाला देतो. लाडकी बहीण योजनेचे पैसे तुमच्या खात्यात टाकणार आहे. आताच अदिती तटकरे यांच्यासोबत बोललो आहे. त्यांनी सांगितले की, इतके हजार कोटी लागतील. आता लगेचच मुंबईला जाणार आहे. जे पैसे लागतील, त्याची तरतूद करणार आहे, असे आश्वासन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले.
दरम्यान, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राज्याच्या महिला व बाल विकास विभागाकडून चालवली जाते. लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना जुलै महिन्यापासून प्रति महिना १५०० रुपये याप्रमाणे लाभ दिला जात आहे. कागदपत्रांत त्रुटी असल्यामुळे तसेच चुकीच्या पद्धतीने अर्ज भरल्यामुळे अनेक महिलांना अद्याप एकाही हप्त्याचे पैसे मिळालेले नाहीत. ज्या महिलांचे बँक खाते आधार क्रमांकाशी लिंक नाही, त्यांच्या बँक खात्यावर लाडकी बहीण योजनेचे पैसे आलेले नाहीत. अद्याप एकही हप्ता न आलेल्या महिलांनी बँक खाते आधार क्रमांकाशी लवकरात लवकर जोडून घ्यावे, असे आवाहन राज्य सरकारने केले आहे. बँक खाते आणि आधार क्रमांक एकमेकांना जोडण्याची अट अजूनही कायम आहे.