सुशीलकुमार शिंदे यांच्या आत्मचरित्रात सावरकरांचं कौतुक
काँग्रेसला विचारसरणी सुधारण्याचा दिला सल्ला
मुंबई
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी केंद्रीय गृहमंत्री महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या आत्मचरित्रात स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबाबत कौतुक करण्यात आलं आहे.
सुशीलकुमार शिंदे यांनी काही काळ राज्यपाल म्हणूनही जबाबदारी पार पाडली आहे. त्यामुळे त्यांच्या आत्मचरित्रात सावरकरांचं कौतुक असल्याने काँग्रेसची आता कोंडी होण्याची शक्यता आहे. “अस्पृश्यता आणि जातीयवाद संपवण्यासाठी सावरकरांचे मुख्य प्रयत्न झाले होते. सावरकर हे विज्ञानवादी होते आणि सावरकरांचे संकुचित विचार हे आव्हानच आहे. काँग्रेसची विचारसरणी सुधारण्याची गरज आहे”, असं परखड मत सुशीलकुमार शिंदे यांनी आपल्या आत्मचरित्रात मांडलं आहे.
“माझ्या मनात सावरकरांविषयी उच्च कोटीचा आदर आहे. त्यामुळे 1983 ला नागपुरात स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या पुतळ्याच्या कार्यक्रमाला हजर राहिलो. सावरकरांना पाठिंबा दिलेल्या मुद्द्यांवर मी ठाम राहिलो. अस्पृश्यता आणि जातीयवाद संपवण्यासाठी सावरकरांनी मोठे प्रयत्न केले. मी स्वत: मागासवर्गातील असल्याने सावरकरांच्या प्रयत्नांचे मला विशेष महत्त्वं वाटते. सावरकरांचा मुद्दा निघाला की त्यांच्या हिंदुत्ववादी विचारसरणीवर इतका भर का दिला जातो, याचं मला आश्चर्य वाटतं. कारण त्यांच्या व्यक्तिमत्वाला अनेक पैलू आहेत”, असं सुशीलकुमार शिंदे म्हणाले आहेत.
सावरकरांमधला तत्वज्ञ आणि विज्ञानवादी आपण पाहू शकत नाही का?, वास्तविक सामाजिक, समता आणि दलितांच्या उद्धाराचा मुद्दा घेवून सावरकर उभे राहिले. सावरकरांचे संकुचित विचार हे आपल्यासमोरचं एक आव्हान आहे. प्रदीर्घ काळ राजकारणात काम केल्यानंतर मला वाटतं की, काँग्रेसच्या विचारसरणीत सुधारणा घडवून आणण्याची गरज आहे”, असंदेखील सुशीलकुमार शिंदे यांनी आत्मचरित्रात म्हटलं आहे.
सुशीलकुमार शिंदे यांचं ‘फाईव्ह डिकेड्स इन पॉलिटिक्स’ अशा नावाचं आत्मचरित्र नुकतंच प्रकाशित झालं आहे. हे आत्मचरित्र सध्या काँग्रेसमध्ये चांगल्याच चर्चेला कारण ठरलं आहे. सुशीलकुमार शिंदे यांनी काँग्रेसची वाटचाल कशी असली पाहिजे, याबाबतचं परखड मत मांडलं आहे. दुसरीकडे काँग्रेस नेते राहुल गांधी यांची सावरकरांबद्दल असलेली भूमिका ही सर्वश्रूत आहे. त्यामुळे काँग्रेसची कोंडी होणं हे स्वभाविक आहे