पटोले, राऊत यांच्यामध्ये वादावादी
मविआच्या बैठकीत जागा वाटपावरून खडाजंगी
मुंबई
महाविकास आघाडीने जागा वाटपावर चर्चा करण्यासाठी आयोजित केलेल्या बैठकीत मोठं नाराजीनाट्य पाहायला मिळालं आहे. विदर्भातील जागा वाटपावर चर्चा करताना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि संजय राऊत यांच्यामधील प्रचंड मतभेद चव्हाट्यावर आले आहेत. विदर्भात सर्वाधिक ताकत काँग्रेस पक्षाची आहे, त्यामुळे त्या जागा आम्हाला मिळाव्यात असा दावा या बैठकीत कँग्रेस नेत्यांनी केला. मात्र त्यावर शिवसेना ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी आक्षेप घेतला. शिवसेना ठाकरे गटाला देखील काही जागा हव्यात अशी मागणी त्यांनी केली, यावरून हा वाद झाला. नाना पटोले यांनी काही काळ बैठकीच्या बाहेर जात नाराजी व्यक्त केली. नंतर इतर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी समजूत काढून राऊत आणि पटोले यांना पुन्हा बैठकीत बसवले.
दरम्यान राज्यातील सध्याची राजकीय परिस्थिती पाहाता यावेळी राज्यात विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडी विरोधात महायुती असंच चित्र असणार आहे. मात्र महाविकास आघाडी आणि महायुतीमधील कोणत्या घटक पक्षांना किती जागा मिळणार? कोण मोठा भाऊ होणार आणि कोण दोन पाऊलं माघार घेणार याबाबत आता मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.