ठाकरेंचे खासदार शिंदेंच्या संपर्कात ?


पक्षांतरबंदी कारवाईचा धोका टाळण्यासाठी प्लॅनही आखला
मुंबई
एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर खिळखिळ्या झालेल्या उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वाखालील शिवसेनेने लोकसभा निवडणुकीत 9 खासदार निवडून आणत महाराष्ट्राच्या राजकारणात अद्याप आपला करिष्मा काय असल्याचे दाखवून दिले होते.आता शिंदे यांच्या नेतृत्त्वाखाली शिवसेनेकडून लोकसभा निवडणुकीत ठाकरे गटाचे नव्याने निवडून आलेले दोन खासदार गळाला लावण्याची तयारी सुरु झाली आहे. शिंदे गटाचे ठाण्याचे नवनिर्वाचित खासदार नरेश म्हस्के यांनी हा खळबळजनक दावा केला आहे.
लोकसभा निवडणुकीत ठाकरे गटाचे एकूण 9 खासदार निवडून आले होते. यापैकी दोन खासदार आमच्या संपर्कात असल्याचा दावा नरेश म्हस्के यांनी केला आहे. ठाकरे गटाच्या या दोन खासदारांनी आमच्याशी संपर्क साधला. आपल्या मतदारसंघात विकासकामे झाली पाहिजेत, अशी त्यांची इच्छा आहे. यासाठी या दोन्ही खासदारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठिंबा देतो, असे सांगितले आहे. मुल्ला-मौलवींना पैसे देऊन मतं मिळवण्याची उद्धव ठाकरेंची भूमिका आम्हाला पटलेली नाही, असे या खासदारांनी आम्हाला सांगितले. मात्र, पक्षांतर केल्यास अपात्रतेची कारवाई होऊ शकते. पक्षांतरबंदी कायद्यातंर्गत कारवाईचा धोका टाळण्यासाठी या दोन खासदारांनी प्लॅनही आखला आहे. आम्ही सहा खासदारांची संख्या जमवतो आणि लवकरात लवकर एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वाखाली मोदी साहेबांना पाठिंबा देऊ, असे या दोन खासदारांचे म्हणणे असल्याचा दावा नरेश म्हस्के यांनी केला आहे.

Advertisement

नरेश म्हस्के यांच्या या दाव्यामुळे ठाकरे गटात मोठी खळबळ उडाली आहे. लोकसभा निवडणुकीनंतर शिंदे गटातील अनेक आमदार माघारी येतील, अशी चर्चा होती. मात्र, आता शिंदे गटाकडून ठाकरे गटाचे नव्याने निवडून आलेले खासदारच फोडण्याची तयारी सुरु झाल्याने महाराष्ट्राच्या राजकारणात नवा भूकंप होणार का, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी मात्र हा दावा फेटाळला आहे. अपघाताने खासदार झालेल्या नरेश म्हस्के यांनी असला थिल्लरपणा करु नये, अशी टीका सुषमा अंधारे यांनी केली.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!