२ एप्रिल रोजी राज्यात नवी आघाडी ?
प्रकाश आंबेडकर यांचे सूचक संकेत
मुंबई :
वंचित आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी आज पत्रकार परिषद घेऊन राज्यात नव्या आघाडीचे संकेत दिले आहेत
२ एप्रिल रोजी भाजपविरोधी आघाडीची सुरुवात होईल. त्यावेली सर्व प्रश्नांची उत्तरे मिळतील. आमच्यासोबत कोण असेल आणि आम्ही कुणासोबत असू?
याची सर्व माहिती २ तारखेलाच दिली जाईल, अशी माहिती प्रकाश आंबेडकर यांनी दिली. तसेच आमचे दरवाजे कुणासाठीही बंद झालेले नाहीत. आमचे दरवाजे उघडेच आहे. महाविकास आघाडीसोबतच चर्चा केली पाहिजे असं नाही. आम्ही वैयक्तिक चर्चाही करू शकतो, असंही प्रकाश आंबेडकर यांनी सांगितलं.
महाविकास आघाडीशी सूत जुळत नसल्याने आता वंचित बहुजन आघाडीकडून मोठी खेळी खेळली जाण्याची शक्यता आहे. जोपर्यंत सुभाष देसाई यांच्याशी चर्चा होत होती, तोपर्यंत सर्व काही सकारात्मक होतं. चर्चा पुढे जात होती. पण नंतर कुणी तरी कुणासाठी आम्हाला वापरून घेत असल्याचं दिसू लागलं. आम्हाला वेगळं पाडण्याचा प्रयत्न केला जात असल्याचं लक्षात आलं, असं सांगतानाच २ एप्रिल रोजी आम्ही सर्व काही क्लिअर करणार आहोत, असं सांगत प्रकाश आंबेडकर यांनी नव्या आघाडीचे संकेत दिले आहेत.
राज्यात ज्या पद्धतीने विरोधी पक्ष उभा राहिला पाहिजे होता तो राहत नाही. महाविकास आघाडीच्या माध्यमातून विरोधी आघाडी उभी राहावी हे आमचं मत होतं. पण आम्हाला बाजूला करण्याचा प्रयत्न झाला. आम्ही इतरांना सोबत घेऊन नवी आघाडी करत आहोत. कुणाला साईड ट्रॅक करू नये, सर्वांना सोबत घेऊन काम करावं असं आमचं म्हणणं आहे. २ तारखेला सर्व काही आम्ही सांगणार आहोत, असं आंबेडकर म्हणाले.
संजय राऊत महाविकास आघाडीबाबत चुकीची माहिती देत आहेत. संजय राऊत महाविकास आघाडीत बिघाडी करत आहेत. मला महाविकास आघाडीकडून माझा मतदारसंघ आणि इतर दुसऱ्या मतदारसंघाचा प्रस्ताव आला होता, असं सांगतानाच मी कुणावर (उद्धव ठाकरे) नाराज नाही. संजय राऊत ही एक व्यक्ती आहे. त्यामुळे मी व्यक्तीविरोधात बोलत नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं.
मनोज जरांगे पाटील यांच्याशी चर्चा झाली आहे. त्यामुळे प्रत्येक मतदारसंघातून एकच उमेदवार दिला जाऊ शकतो. सकल मराठा समाजाला त्यांनी तशी पत्र दिलं आहे. जरांगे यांच्याकडून एकच उमेदवार येईल. उद्यापर्यंत त्यांच्याकडून माहिती येऊ शकते, असंही त्यांनी स्पष्ट केलं.
