सातारा हिल मॅरेथॉन १ सप्टेंबरला


१२ मे पासून पोलीस परेड ग्राउंडवर प्रशिक्षण

सातारा :सातारा रनर्स फौंडेशनची हिल मॅरेथाॅन १ सप्टेंबरला होणार असून त्याचा सराव १२ मे पासून सुरू करण्यात येणार आहे . सातारा रनर्स फौंडेशनची बाराव्या वार्षिक सर्वसाधारण सभेत हि माहिती देण्यात आली दरम्यान सातारा रनर्स फौंडेशनच्या अध्यक्षपदी डॉ. अदिती घोरपडे यांची तर उपाध्यक्षपदी आर्किटेक्ट उपेंद्र पंडित व सेक्रेटरीपदी विशाल ढाणे यांची निवड करण्यात आली.
स्पर्धेचे रेस डायरेक्टर म्हणून अभिषेक भंडारी यांची पुनर्नियुक्ती करण्यात आली आहे.
यावेळी बोलताना संस्थापक अध्यक्ष डॉ. संदीप काटे म्हणाले, ‘स्पर्धा रविवार, दिनांक १ सप्टेंबर रोजी होणार आहे. एक्स्पो हा शुक्रवार, दिनांक ३० आणि शनिवार दिनांक ३१ ऑगस्ट २०२४ रोजी शेंद्रे येथे आहे. जिल्ह्यातील आधारकार्ड असलेल्या स्थानिक स्पर्धकांना स्पर्धेमध्ये प्राधान्य देणार असून त्यांना फीमध्ये सवलत असणार आहे. १६ आठवड्याचा लाॅंग रन प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित केला असून हे प्रशिक्षण दिनांक १२ मे पासून पोलीस परेड ग्राउंड, सातारा येथे सकाळी ५.४५ वाजता सुरु होईल.

मेडिकल डायरेक्टर डॉ. प्रतापराव गोळे यांनी मनोगत व्यक्त केले. रेस डायरेक्टर अभिषेक भंडारी यांनी गेल्या वर्षीचा स्पर्धेचा सविस्तर अहवाल आणि अंदाजपत्रक सादर केले. याप्रसंगी माजी अध्यक्ष अॕड. कमलेश पिसाळ यांचा महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या सचिव पदी निवड झाल्याबद्दल सर्व सभासदांच्या वतीने सत्कार करण्यात आला. सचिव डॉ. रंजिता गोळे यांनी सूत्रसंचालन व आभार मानले. यावेळी डॉ. चंद्रशेखर घोरपडे, डॉ. प्रतापराव गोळे, डॉ. पल्लवी पिसाळ, डॉ. सुचित्रा काटे, डॉ. अविनाश शिंदे, डॉ. देवदत्त देव, डाॅ. अश्विनी देव, शैलेश ढवळीकर, डॉ. अजय शेडगे, डॉ. महेश विभुते, मंगेश वाडेकर सभासद उपस्थित होते.

Advertisement

मॅरेथाॅनसाठी प्री रजिस्ट्रेशन आणि फायनल रजिस्ट्रेशन अशा दोन टप्प्यात स्पर्धेचे रजिस्ट्रेशन ऑनलाइन पध्दतीने होणार आहे. रजिस्ट्रेशनचा पहिला टप्पा ३ एप्रिल २०२४ रोजी सकाळी ६ वाजता ते ७ एप्रिल २०२४ रोजी सायंकाळी ६.०० वाजेपर्यंत खुला असणार आहे. यामध्ये स्पर्धकाने तपशील भरायचा आहे. प्री रजिस्ट्रेशनवर माहिती भरायची आहे, या टप्प्यावर पैसे भरायचे नाहीत.प्री रजिस्ट्रेशन झाल्यावर ई मेल आयडी वर एक कोड येईल, हा कोड म्हणजे फायनल रजिस्ट्रेशनसाठीचा पास असणार आहे. ज्या स्पर्धकांनी प्री रेजिस्ट्रेशन केलं आहे फक्त त्यांनाच दुसऱ्या टप्प्यात दि. १० एप्रिल रोजी रजिस्ट्रेशन फी भरून स्पर्धेचे फायनल रजिस्ट्रेशन करण्याची संधी मिळेल.

सातारा हाफ हिल मॅरेथाॅनने जागतिक पातळीवर आपल्या कर्तृत्वाने ठसा उमटविला आहे. यात सहभागी होणाऱ्या प्रत्येक स्पर्धकाचे हे यश आहे. तेराव्या वर्षात पर्दापण करणाऱ्या या रेसला सातारकरांच्या आरोग्य समृध्दीशी जोडण्याचा प्रयत्न करणार आहे. आरोग्यदायी साताऱ्यासाठी ही रेस अनेकांच्या आयुष्यात बदल घडवून आणणारी ठरेल यात शंकाच नाही अशी माहिती डाॅ. अदिती घोरपडे यांनी दिली


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!