महानायक सुरेशदादा
आज सकाळची रपेट जरा लांबलीच.काही जुने मित्र खूप दिवसांनी भेटले.मग वेळ कसा गेला कळलेच नाही.त्यांच्या भेटीगाठी आटोपून शेवटची फेरी मारून घरी परत येत असताना तो भेटला…तो..आपला किशोरदा..मुसाफिर हूँ यारों…ना घर है ना ठिकाना..बस,चलते जाना है…. तो गात होता … गातच होता..ते सूर. तो आवाज वेड लावत होता…त्याच नादात घरी येत असताना माझ्या जिवलग मित्राची आठवण आली.तो पण असाच कलंदर…आयुष्यभर अशीच मुशाफिरी करत आनंदाने जगणारा…हो,तोच..
तुमच्या-आमच्या मनात कायमस्वरुपी घर करून राहिलेला…अष्टपैलू महानायक. ..सुरेश साधले.. वयाची पंचाहत्तरी साजरी करणारा…
गेल्याच आठवड्यात तो भेटला आणि तेव्हाच त्याने 17 मार्चला सातारला यायचे आहे, असे निमंत्रण दिले.माझा मुलगा सुधन आणि कुटुंबियांनी माझा ‘अमृत महोत्सव’ साजरा करायचे ठरवले आहे.तुला यायचे आहे असे तो म्हणाला
सुरेश आणि मी यांच्या मैत्रीचे अर्धशतक पूर्ण व्हायला काही दिवस बाकी असताना या आनंद क्षणांची आठवण मला पुन्हा झाली.त्याची भेट झाली ती शाहू स्टेडियमवर.त्या पहिल्या भेटीत खात्री पटली की ,मैत्रीचे सूर नक्की जुळणार.नंतर घडले पण तसेच.मी क्रिकेट असो.मध्ये होतो.तो टेबल टेनिस असो.मध्ये.संस्था वेगळ्या तरी काम करणारी तीच मंडळी, असा तो काळ होता.त्यात मन लावून,सर्वस्व अर्पण करून काम करायची सवय अंगवळणी पडली.त्यामुळे नंतरची अनेक वर्षे अशीच मजेत गेली.पण त्याच वेळी कळले,सुरेश लंबी रेस का घोडा है…त्याची काम करण्याची पद्धत,संघटन कौशल्य,माणसे जोडण्याची,जपण्याची वृत्ती विलक्षण आहे.मग टेबल टेनिस, बॅडमिंग्टन असे खेळ असोत की बास्केटबॉल,फुटबॉल असे मैदानी खेळ असोत,सर्वत्र त्याचा आणि माझा मुक्त संचार.या खेळाच्या प्रेमापोटी संस्था उभ्या करणे,त्या नावारूपाला आणणे आणि त्यातून खेळ,खेळाडू जिवंत ठेवणे हा उद्देश समोर ठेवून जगणे.हे सारे करताना कसली अपेक्षा नाही,मोठेपण नाही.फक्त मिशन म्हणून कार्य करत राहणे,आपल्या सातारचे नाव मोठे करणे.इथल्या मातीत वाढलेल्या खेळाडूंचा भारतभर डंका पिटावा , हाच हेतू.
सुरेशची क्रीडा क्षेत्रातील ही भरारी अनुभवणारा मी एक भाग्यवान.अनेक राज्य,राष्ट्रीय स्पर्धांचे देखणे,यशस्वी आयोजन ही त्याच्या कार्याची पावती.राज्य, राष्ट्रीय स्तरावर अनेक क्रीडा संघटनांत त्याने मानाची पदे भूषवली.जिल्हा संघटना सर्वार्थाने मजबूत केल्या.त्यांचा लौकिक वाढवला तो त्याने ,आपल्या कर्तृत्वाने.त्याच्या जोडीला त्याची लेखणी.क्रीडा पत्रकार म्हणून त्याचा दबदबा असाच.ही पत्रकारिताही स्वत:ची एस.टी. ताली नोकरी सांभाळून!ड्युटी संपली की हा बहाद्दर नव्या जोमाने ऐक्य कार्यालयात हजर व्हायचा. पहाटे पहाटे- पर्यंत जागून टेलीप्रिंटरच्या बातम्या निवडून,भाषांतरित करून संपादित करायचा.याशिवाय विविध विषयांवरच्या पुरवण्या,लेख यांची गणतीच नाही. शेकडो लेख,मुलाखती असा खजिना त्याच्याकडे आहे.आठवणी,किस्से यांचा अनमोल ठेवा त्याने जपून ठेवला आहे.त्याच्या बरोबर गप्पा मारत असताना ही सारी दौलत तो मुक्त हस्ताने उधळत असतो.ही दौलत अनुभवत असताना मलाही खूप काही शिकता आलं,काही लिहिता आलं.पण त्या मागे प्रेरणा त्याची.तो एक संदर्भ ग्रंथ आहे.कधीही,केव्हाही साद घातली की क्षणात प्रतिसाद मिळतो.अशी दिलदार मैत्रीची श्रीमंती मी अनुभवली आहे.
पत्रकारितेच्या क्षेत्रात माझे प्रवेशद्वारही त्यानेच उघडले.त्यामुळे चाळीस वर्षे त्या क्षेत्रात मुशाफिरी करता आली.आता दोघेही निवृत्त झालो असलो तरी त्या आठवणी अजून जाग्या होतात,हात लिहिता होतो.सुरेशचे जग फक्त क्रीडा क्षेत्रापुरते मर्यादित नाही.त्याचा संचार सर्वत्र. एस. टी.कामगार संघटनाअसो,सामाजिक कार्य असो,रंगभूमी असो,संगीत क्षेत्र असो,सर्व क्षेत्रातील त्याची मुशाफिरी मी अनुभवली आहे.या सर्व क्षेत्रात त्याच्या खांद्याला खांदा लावून काम करण्याचे भाग्य मला लाभले आहे.ते जवळून पाहात असताना हा किती दादा माणूस आहे आणि त्याची हवीहवीशी वाटणारी दादागिरी पण किती मोलाची आहे ते लक्षात येते.
सुरेश समाजात जसा दादा माणूस आहे तसा परिवारातही तो दादाच! आई,वडिलांच्या पुण्याईचे पाठबळ मिळाले असले तरी प्रतिकूल परिस्थितीला सामोरे जात त्याने साऱ्या कुटुंबाला सावरले आहे.भावंडात तो जरी थोरला नसला तरी मानाचे थोरलेपण त्याने सांभाळले आहे,ते कर्तृत्वाच्या जोरावर.म्हणून सारा परिवार आज सुखा- समाधानात नांदत आहे.कर्तृत्ववान, समंजस अर्धांगिनी,
तशीच मुले हा त्याच्या आयुष्यातला भाग्याचा ठेवा आहे.हे भाग्य आज अमृत महोत्सव सोहळ्याच्या रुपात आपण सर्व अनुभवत आहोत.
मैत्री,मैत्र जपणारा मैत्रीच्या दुनियेतला तो राजा माणूस आहे. प्रत्येकाच्या सुख, दुःखात सहभागी होताना त्याच्यातला संवेदनशील माणूस आपण सर्वांनी अनुभवला आहे.’नाही’ हा शब्द ज्याच्या
शब्दकोशात नाही, असा हा सन्मित्र लाथ मारेन तिथे पाणी काढेन या वृत्तीने जगणारा आहे.माणसात सतत रमणारा आणि माणसांच्या गर्दीत हरवलेला असामी ही पण त्याची ओळख आहे.म्हणून तो मला महानायक वाटतो.अशीच अनुभूती तुम्हालाही आली असेल याची खात्री आहे.
आज अमृत महोत्सव साजरा करणाऱ्या या मित्राला देवानेआरोग्यदायी दीर्घ आयुष्य द्यावे,आनंदाचे गाणे त्याच्या ओठावर आणि मनात सतत राहावे अशी शुभेच्छा….
-शरद महाजनी