विदर्भाची कडवी लढत,पण मुंबई विजयी


मुंबईने ४२ व्यांदा जिंकला रणजी चषक

मुंबई : रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेत विदर्भाच्या संघाने मुंबईच्या संघाला अंतिम फेरीत कडवी झुंज दिली खरी, पण अखेर मुंबईने अचूक गोलंदाजी करत विदर्भाला आपल्या जाळ्यात ओढले. त्यामुळे मुंबईला अंतिम फेरीत १६९ धावांनी दमदार विजय साकारता आला. मुंबईने यावेळी विदर्भाचा दुसरा डाव ३६८ धावांत आटोपला आणि दमदार विजय साकारला.मुंबईच्या संघाने चे ४२ व्यांदा जेतेपद पटकावले.
विदर्भाच्या संघाने पाचव्या दिवशी दमदार सुरुवात केली होती. कारण विदर्भाचा कर्णधार अक्षय वाडेकरने शतक झळकावले होते. अक्षयला यावेळी हर्ष दुबेने चांगली साथ दिली. या दोघांनी पहिल्या सत्रात मुंबईच्या संघाला चांगलेच वेठीस धरले होते. हळूहळू या दोघांनी धावा जमवायला सुरुवाते केली आणि विदर्भाचा संघ हा विजय मिळवू शकतो, असे दिसत होते. अक्षयने यावेळी शतक झळकावले आणि तो आता संघाला विजयाच्या दिशेने घेऊन जात होते. पण तनुश कोटीयनने त्याला बाद केले आणि मुंबईच्या संघाला मोठे यश मिळवून दिले. अक्षयने यावेळी १०२ धावांची दमदार खेळी साकारली. अक्षय बाद झाला आणि तिथेच हा सामना मुंबईच्या बाजूने फिरल्याचे पाहायला मिळाले. कारण अक्षयला बाद केल्यावर तुषार देशपांडेने हर्ष दुबेला बाद केले आणि विदर्भाला अजून एक मोठा धक्का दिला. हर्षने यावेळी ६५ धावांची खेळी साकारली. विदर्भाचे हे दोन्ही सेट झालेले फलंदाज बाद झाले आणि तिथेच मुंबईचा संघ विजयाच्या वाटेवर परतला. तनुश कोटीयन, तुषार देशपांडे आणि धवल कुलकर्णी यांनी त्यानंतर प्रत्येकी एक विकेट मिळवली आणि संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. मुंबईचे हे ४२ वे जेतेपद ठरले आहे. रणजी स्पर्धेत सर्वाधिक जेतेपदं मिळवण्याचा विक्रम मुंबईच्याच नावावर कायम आहे.

Advertisement

मुंबईच्या संघाने विदर्भाला विजयासाठी ५३८ धावांचे आव्हान दिले होते. सामन्याच्या चौथ्या दिवशी मुंबईचा संघ विजय मिळवेल, असे सर्वांना वाटत होते. पण त्यावेळी करुण नायरने तब्बल २२० चेंडू खेळून अर्धशतक झळकावले आणि मुंबईचा विजय लांबणीवर गेला. पाचव्या दिवशी अक्षय आणि हर्ष यांनी मुंबईला कडवी झुंज दिली, पण त्यांना मुंबईला विजयापासून रोखता आले नाही. विदर्भाच्या संघाने मुंबईला चांगली लढत दिली. पाचव्या दिवशीही सामना दोलायमान अवस्थेत होता. पण विदर्भाच्या संघाला कामगिरीत सातत्य राखता आले नाही आणि त्यामुळे त्यांचा पराभव झाला. दुसरीकडे अजिंक्य रहाणेने अनुभव पणाला लावत मुंबईला रणजी स्पर्धेचे जेतेपद जिंकवून दिले.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!