ईडी हा भाजपचा घटकपक्ष:शरद पवार
रोहित पवारांवर अटकेची कारवाई होऊ शकते, पवारांकडून चिंता व्यक्त
पुणे: भाजपा ईडीचा विरोधीपक्ष संपवण्यासाठी वापर करत आहे,ईडी हा जणू काही भाजपचा घटक पक्ष आहे असा असा आरोपराष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष यांनी केला आहे.लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रोहित पवारांच्या अडचणी वाढवण्यासाठी त्यांच्यावर अटकेची कारवाई होण्याची शक्यता स्वत: शरद पवार यांनी बोलून दाखवली आहे. त्यासोबत २०१९ ते २०२४ पर्यंत ईडीने केलेल्या कारवाईचा आकडा वाचून दाखवत भारतीय जनता पक्षावर टीका केली आहे.

शरद पवार यांनी आज पत्रकार परिषद घेत, ईडीने केलेल्या कारवाईचा दाखला वाचून दाखवला आणि रोहित पवार यांना अटकेची कारवाई होण्याच्या शक्यतेबाबत पवार यांनी चिंता व्यक्त केली.ईडीचा वापर हा निवडणुकांना समोर जाणाऱ्या लोकप्रतिनिधींचा आवाज दाबण्याचा केला जात आहे. ईडी, सीबीआय, आणि इतर केंद्रीय तपास यंत्रणाचा वापर हा सर्रास विरोधकांचा आवाज दाबण्यासाठी केला गेला आहे. रोहित पवारांच्या बाबतीत देखील त्यांच्या कारखान्याच्या जप्तीची प्रक्रिया सुरु करण्यात आलीय,असं पवार म्हणाले.
ईडीच्या पाच हजार केसेसपैकी फक्त पंचवीस केसेसचा निकाल लागलाय. त्यातील किती प्रकरणात लोक दोषी आढळलेत याचे प्रमाण शुन्य टक्क्यांहून कमी आहे. २००४ ते २०१४ या कॉंग्रेसच्या सत्तेच्या कालावधीत ईडीने २६ कारवाया केल्या. त्यातील ४ नेते कॉंग्रेसचे होते तर तीन नेते भाजपचे होते. याचा अर्थ कॉंग्रेसच्या सत्ताकाळात ईडीचा गैरवापर होत नव्हता. त्यामुळे आताचे भाजपाचे सत्ताधारी लोक हे ईडीचा उपयोग दहशत निर्माण करण्यासाठी करत आहेत, असा आरोप पवारांनी केला.
