अमृता फडणवीस यांचा नोकरीचा राजीनामा
23 वर्षे बँकेत सेवा केल्यानंतर सोशल मीडियावर भावनिक पोस्ट
मुंबई
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी बँकिग क्षेत्रात तब्बल 23 वर्षांची प्रदीर्घ सेवा बजावल्यानंतर आपल्या नोकरीचा राजीनामा झाला आहे. अॅक्सिस बँकेत वरिष्ठ उपाध्यक्षपदावर कार्यरत असलेल्या अमृता फडणवीस यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून ही माहिती दिली आहे. व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी ते वरिष्ठ उपाध्यक्ष असा त्यांचा अॅक्सिस बँकेतील प्रवास होता.
अमृता फडणवीस यांनी सोशल मीडियावर एक भावनिक पोस्ट करत आपल्या 23 वर्षांच्या प्रवासाचे सिंहावलोकन करत आपल्या संस्थेविषयी कृतज्ञता व्यक्त केली आहे. 23 वर्षांपूर्वी अॅक्सिस बँकेत व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी (मॅनेजमेंट ट्रेनी) म्हणून त्यांनी करिअरची सुरुवात केली होती. मेहनत, सातत्य आणि व्यावसायिक कौशल्याच्या जोरावर त्यांनी विविध जबाबदाऱ्या यशस्वीरीत्या पार पाडत वरिष्ठ उपाध्यक्षपदापर्यंत मजल मारली. शाखा संचालन, कॉर्पोरेट बँकिंग, ट्रेझरी, ग्राहक संबंध आदी महत्त्वाच्या विभागांत त्यांनी प्रभावी नेतृत्व केले.
अॅक्सिस बँक ही संस्था माझ्यासाठी केवळ कामाचे ठिकाण नव्हते, तर ती माझे कुटुंब, गुरु आणि दुसरे घर राहिली आहे,’ अशा शब्दांत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. या दीर्घ प्रवासात सहकार्य करणाऱ्या सर्व सहकाऱ्यांचे तसेच मार्गदर्शन करणाऱ्या वरिष्ठांचे त्यांनी मनापासून आभार मानले. विशेषतः बँकेचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी अमिताभ चौधरी यांचे त्यांनी आभार मानले. अमृता फडणवीस यांनी आपल्या पोस्टमध्ये नमूद केले की, बँकेतील प्रत्येक टप्प्यावर त्यांना शिकण्याची संधी मिळाली आणि व्यावसायिक तसेच वैयक्तिकदृष्ट्या समृद्ध होण्यास या संस्थेने मोठे योगदान दिले

