किल्ले शिवनेरीवर छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सव साजरा


शिवरायांच्या मार्गावर चालणे हाच विकासाचा खरा मार्ग- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

पुणे,
छत्रपती शिवरायांनी दिलेला मार्ग हाच सर्वांगीण विकासाचा मार्ग आहे. त्यांच्या कार्याचा हा आदर्श जगासमोर ठेवण्यासाठी २०३० साली छत्रपती शिवाजी महाराजांची ४०० वी जयंती भव्य आणि जागतिक स्तरावर साजरी केली जाईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
किल्ले शिवनेरीवर आयोजित शिवजन्मोत्सव सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा अजित पवार, सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार, आमदार शरद सोनवणे, माजी आमदार अतुल बेनके, कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत वाघमारे, जिल्हा पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल्ल, उपवनसंरक्षक आशिष ठाकरे, अभिनेता रितेश देशमुख, मराठा सेवा संघाचे प्रदेशाध्यक्ष विजय घोगरे आदी उपस्थित होते.
छत्रपती शिवाजी महाराज नसते तर आज भारताचा इतिहास आणि भूगोलही वेगळा असता असे नमूद करून मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, अनेक राजे-रजवाडे मोगलांच्या अधिपत्याखाली काम करत असताना आई जिजाऊंनी घडविलेल्या छत्रपती शिवरायांनी रयतेचे स्वराज्य स्थापन करून हिंदुस्थानाला नवी दिशा दिली. छत्रपती शिवरायांनी १८ पगड जातींच्या मावळ्यांना एकत्र करून स्वराज्याची स्थापना केली. ‘हे माझे राज्य नसून रयतेचे राज्य आहे,’ अशी भूमिका त्यांनी घेतली. देव, देश आणि धर्मासाठी लढा देण्याची प्रेरणा देत त्यांनी सामान्य जनतेला मोगलांच्या जोखडातून मुक्त करण्याचे कार्य केले. त्यांच्या राज्यात समता, सन्मान, न्याय आणि स्त्रीसुरक्षा यांना प्राधान्य होते. शेतकरी समाधानी राहील, अन्याय-अत्याचार होणार नाहीत, अशी राज्यव्यवस्था त्यांनी उभी केली, असे मुख्यमंत्री म्हणाले.
मराठा सेवा संघाच्या निवेदनावर राज्य सरकार सकारात्मक काम करेल, तसेच मांडण्यात आलेल्या सर्व मुद्द्यांवर विचार करण्यात येईल, अशी ग्वाही देऊन मुख्यमंत्री फडणवीस राज्यातील आणि जगभरातील शिवप्रेमींना शिवजयंतीच्या शुभेच्छा दिल्या.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज हे युगपुरुष होते. त्यांच्या दूरदृष्टीतून उभे राहिलेले स्वराज्य आजही सुशासनाची प्रेरणा देते. शिवरायांच्या विचारांवर चालत बलशाली व स्वाभिमानी महाराष्ट्र घडविण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.

Advertisement

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार म्हणाल्या, दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासाठी शिवनेरी किल्ला, ही शिवजन्मभूमी केवळ ऐतिहासिक स्थळ नव्हते, तर ते त्यांच्या विचारांचे आणि कार्याचे प्रेरणास्थळही होते. पवित्र शिवनेरी किल्ल्याविषयी केवळ जिव्हाळाच नव्हता, तर या शिवजन्मभूमीचे सौंदर्य वाढावे, तिचा ऐतिहासिक वारसा जपला जावा आणि भावी पिढ्यांना अभिमानाने दाखवता यावा, यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले. त्यांच्या पुढाकारातून ‘किल्ले शिवनेरी विकास आराखडा’ साकार झाला आणि या परिसराच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यात आला.

प्रारंभी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत शिवजन्मस्थानी पारंपरिक वेशातील महिलांनी शिवरायांची महती सांगणारा पाळणा गायिला. राष्ट्रगीत तसेच ‘गर्जा महाराष्ट्र माझा’ या राज्यगीताची धून पोलीस बँड पथकाने वाजवून सलामी दिली. त्यानंतर पोलीस पथकाने बंदुकीच्या तीन फैरी झाडून छत्रपती शिवरायांना मानवंदना दिली. यावेळी जिल्हा परिषद शाळच्या लहान विद्यार्थ्यांच्या पथकाने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनातील प्रसंग सुंदर पद्धतीने सादर केले.
त्यानंतर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी बाल शिवाजी व माँसाहेब जिजाऊंच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केला. आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेची पालखी वाहीली.
यावेळी मुख्यमंत्री यांच्या हस्ते प्रगत प्रगतशील शेतकरी स्व. पंकज वामन, खारघर येथील टाटा कॅन्सर रुग्णालयाचे विभाग प्रमुख डॉ. विनोद सीताराम हांडे, लेफ्टनंट अजिंक्य मेहेर, माजी पंचायत समिती सभापती शिवाजीराव खैरे आणि उपलेफ्टनंट श्रुतिका ताथवडे यांना शिवनेर भूषण पुरस्कार प्रदान करण्यात आले.

कार्यक्रमास उपविभागीय अधिकारी गोविंद शिंदे, मराठा सेवा संघाचे पदाधिकारी यांच्यासह शिवभक्त उपस्थित होते


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!